केंद्रप्रमुख पदे कायम
By Admin | Updated: July 23, 2014 21:56 IST2014-07-23T21:37:50+5:302014-07-23T21:56:26+5:30
सुरेश पेडणेकर : विधानसभा अध्यक्षांनी दिले आश्वासन

केंद्रप्रमुख पदे कायम
कणकवली : संपूर्ण महाराष्ट्रात १० जून २०१४ पूर्वी तात्पुरती तसेच अभावितपणे भरण्यात आलेली केंद्रप्रमुख पदे कायम करण्यात येतील. असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे सल्लागार सुरेश पेडणेकर यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ नोव्हेंबर १९९४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ४८६० केंद्रप्रमुखांची पदे निर्माण केली. ही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्याची शासन निर्णयात तरतूद होती. गेली २० वर्षे ही पदे कार्यरत असून ती १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. परंतु २ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार ही पदे ४० टक्के सरळसेवेने, ३० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेने तर उर्वरित ३० टक्के पदोन्नतीने अशी करण्यात आली. मात्र या शासन निर्णयात याची कार्यप्रणाली दिलेली नसल्यामुळे या शासन आदेशाची कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रप्रमुखांची अनेक पदे रिक्त राहिली. त्याचा ताण प्रशासनावर व शैक्षणिक कामकाजावर होऊ लागल्याने २५ जून २०१० रोजी पुन्हा एकदा आदेश काढण्यात आला. यामध्ये १ फेब्रुवारी २०१० पूर्वी रिक्त असणारी सर्व केंद्रप्रमुखांची पदे पूर्वीच्या पद्धतीने भरण्यासाठी परवानगी दिली. ही पदे भरूनसुद्धा विशिष्ट तारखेच्या मर्यादेमुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेच्या संचालकांनी २९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रानुसार सर्व रिक्त पदे तात्पुरत्या तसेच अभावितपणे भरण्याची अनुमती दिली.
त्याप्रमाणे काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रापूर्वी तर काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रानंतर आपल्याकडील १०० टक्के रिक्त पदे पदोन्नतीने भरली. (वार्ताहर)
-दरम्यान, महाराष्ट्र शासनाने केंद्रप्रमुखांची पदे ४०:३०:३० अशी केल्याची अधिसूचना १० जून २०१४ रोजी प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात भरलेल्या केंद्रप्रमुखांवर होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेतली व लेखी निवेदन सादर केले. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्रप्रमुख पदे कायम करण्याची विनंती केली. संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, असेही या पत्रकात म्हटले आहे.