अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडव
By Admin | Updated: January 5, 2015 00:41 IST2015-01-04T19:49:54+5:302015-01-05T00:41:12+5:30
आरोग्यमंत्र्यांची माहिती : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला भेट

अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडव
सावंतवाडी : सावंतवाडी कुटिर रूग्णालयाला आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णालयात नवीन काय हवे, याची माहिती घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न तसेच रूग्णालय दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. आरोग्यमंत्र्यांनी रूग्णांशीही संवाद साधला
यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यु. बी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सहाय्यक संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक सतिश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, डॉ. प्रविण पितळे आदी उपस्थीत होते.
आरोग्यमंत्री सावंत यांनी प्रथम उपजिल्हा रूग्णालयात जाऊन ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे का, हे पाहिले तसेच रूग्णांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली. तसेच मध्यंतरी शववाहिनीबाबत घडलेल्या प्रकाराबाबत डॉ. पाटील यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी जनरेटरची मागणी केली. त्यांनी येत्या काही दिवसात जनरेटर देण्याचे मान्य केले. तर रूग्णालयात लागलेल्या गळतीबाबतचा प्रश्न निकाली काढू, असे सांगून यासाठी त्यांनी दोन कोटी रूपये देण्याचे मान्य केले. रूग्णालय अधिकाऱ्यांच्या निवास्थानाबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच हा प्रश्न ही निकाली काढण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
आरोग्यमंत्र्यांची फिरकी
रूग्णांना देण्यात आलेल्या चादरवरून आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची फिरकी घेतली. मात्र सहाय्यक संचालक अर्चना पाटील यांनी चादरीबाबत नवीन नियमावली लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी रूग्णालय स्वच्छता आजच ठेवली का, असे विचारताच अधिकारी चांगलेच चक्रावून गेले आणि नेहमीच करतो, असे उत्तर दिले.