विद्यापीठ रोजंदार कामगारांना दिलासा
By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-14T22:55:15+5:302014-09-15T00:02:12+5:30
कुलगुरुंचा पाठपुरावा : १८० रुपये मजुरी मिळणार

विद्यापीठ रोजंदार कामगारांना दिलासा
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सुमारे ३३५ रोजंदार कामगार निष्ठेने काम करीत आहेत. या रोजंदार कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाकडे पाठविला होता. याबाबत कुलगुरुंनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. मात्र, त्यांचा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकला असून, त्या मोबदल्यात रोजंदार कामगारांना १८० रुपये मजुरी देण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे रोजंदार कामगारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात २५ ते ३० वर्षांपासून सुमारे ३३५ कामगार रोजंदारीचे काम करीत आहेत. या रोजंदारांनी १५ रुपयांपाासून या विद्यापीठात कामे केली आहेत. वाढती महागाई लक्षात घेता त्यांच्या मजुरीचे दर वाढणे गरजेचे होते. वाढत्या महागाईचा विचार करुन रोजंदार कामगारांची मजूरी वाढविण्यात यावी. मजुरांना कामावर कायम करण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिक कामगार शासनाच्या विरोधात वारंवार आंदोलने करीत होते. परंतु रोजंदार कामगारांना आजपर्यंत न्याय मिळाला नव्हता. कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांनी रोजंदार मजुरांचा प्रश्न लावून धरत शासनाकडे पाठपुरावा केला. विद्यापीठाने या कामगारांचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्या प्रस्तावावर शासनस्तरावर मान्यता मिळेपर्यंत त्यांना दिवसाला २३० रुपये देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाकडे पाठविला. या प्रस्तावावर शासनाने १८० रुपये देण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे १६५ रुपयांवरुन १८० रुपये मजूरी झाली आहे.
त्यामुळे शासनाच्या या निर्णयाने या विद्यापीठातील कंत्राटी मजुरांना अल्पसा का होईना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
कृषी विद्यापीठात २५ वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कामगारांना हक्काची सुटी नाही. रविवारची सुटी नाही. सुटीच्या दिवसाची मजुरी मिळत नाही. त्यामुळे २० ते २५ दिवसच भरतात. कामगारांना पूर्ण महिन्याचा पगार मिळावा, अशी वारंवार विद्यापीठाकडे विनंती करुनही दखल घेण्यात आली नाही. विद्यापीठात सामावून घेण्याची आमची मागणी आहे.
- सुहास जाधव, कामगार नेते
रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी दिला होता प्रस्ताव.
प्रस्ताव अडकला शासनाच्या लालफितीत.
वाढलेल्या मजुरीमुळे मजुरांना अल्पसा दिलासा.
कृषी विद्यापीठाने दिला होता २३० रुपये मजुरीचा प्रस्ताव.
सध्या मजुरांना मिळतेय १६५ रुपये मजुरी.