केमिकल झोनला विरोध करण्याचा ठराव

By Admin | Updated: October 1, 2015 22:35 IST2015-10-01T22:35:49+5:302015-10-01T22:35:49+5:30

जिल्हा परिषद : तीन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

Resolution to oppose the chemical zone | केमिकल झोनला विरोध करण्याचा ठराव

केमिकल झोनला विरोध करण्याचा ठराव

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा केमिकल झोन नको, केमिकल झोनला विरोध करण्यात येईल, असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी ठराव मंजूर करुन तो ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज तिसऱ्या दिवशी अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी तीन दिवस चाललेल्या सभेतून प्रशासनाने बोध घ्यावा, असा सल्ला देत सभा संपल्याचे जाहीर केले. गेले तीन दिवस चाललेल्या या सभेत विषय पत्रिकेवर १५ विषय आणि आयत्या वेळचे अधिकाऱ्यांचे १७ विषय, याबद्दल सदस्य उदय बने यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच आयत्या वेळच्या विषयांमध्ये पदवीधर शिक्षकांना बी. एड. परवानगीचा विषय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषद शाळांना पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांना बी. एड. करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उदय बने, विलास चाळके यांनी केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बी. एड. हा दोन वर्षांचा कोर्स असल्याने त्यासाठी शिक्षकांना परवानगी देणे परवडणारे नाही. आयुक्तांनीही शिक्षकांना बी. एड. परवानगी देऊ नये, अशी सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी स्पष्ट केले. परवागनीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी बने यांनी पदवीधर आवश्यक असल्याने त्यांना बी. एड. साठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरून आज तिसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली. यामध्ये अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले होते. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमावरून सदस्य भगवान घाडगे यांनी निधी असतानाही कामाचा आराखडाच तयार नसल्याने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभाग असतानाही पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेण्यात आलेली नसल्याने आणखी किती दिवस जाणार आहेत, असा प्रश्न उपस्थित घाडगे यांनी उपस्थित केला.
महावितरणकडून पानवल येथे रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर विद्युत पोल उभारले आहेत. त्याची तत्काळ पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. रस्त्यांच्या कडेला अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.
जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतानाही शासनाकडून येथे केमिकल झोन म्हणून करण्याचा घाट घातला जात आहे. त्याला सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. जिल्ह्यात केमिकल झोन नको, असा महत्त्वपूर्ण ठराव सर्वपंक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला. हा ठराव शासनाला तत्काळ पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच शासनाकडे पर्यटन विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी सभेत केली.
सभेला उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, सदस्य भगवान घाडगे, विश्वास सुर्वे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक, अन्य सदस्य व अधिकारीवर्ग उपस्थित होता. (शहर वार्ताहर)

Web Title: Resolution to oppose the chemical zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.