शंभर युवा सैनिकांचा नेत्रदानाचा संकल्प
By Admin | Updated: November 7, 2014 23:44 IST2014-11-07T21:56:34+5:302014-11-07T23:44:14+5:30
१७ नोव्हेंबरला नेत्रदानाचे अर्ज भरणार

शंभर युवा सैनिकांचा नेत्रदानाचा संकल्प
कुडाळ : कुडाळ येथील युवा सेनेच्या शंभर युवा सैनिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ते १७ नोव्हेंबरला नेत्रदानाचे अर्ज भरणार असल्याचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सिंधुदुर्गात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची फौज निर्माण होत आहे. संघटना बांधणीसाठी युवासेना कार्यरत असतानाच सामाजिक, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबविणे यासाठी युवासेना कार्यरत आहे. सामाजिक भावनेतून १७ नोव्हेंबर रोजी १०० युवा कार्यकर्ते मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करणार असून याचा शुभारंभ या दिवशी अर्ज भरून करण्यात येणार आहे. संघटना बांधणीसाठी आता महाविद्यालयांमध्ये युवासेना स्थापन करून शिवसेनेला बळ देणार आहे. तरुणी वर्गासाठी संरक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत. रक्तदानासारखे शिबिर सातत्याने घेऊन सामाजात युवा सेना आपले वेगळे स्थान निर्माण करणार आहे.
यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे विचार सोबत घेऊन युवासेना जिल्ह्यात घोडदौड करणार असल्याचे मंदार शिरसाट यांनी पत्रकात म्हटले
आहे. (प्रतिनिधी)