अधिकार्यांना घरेच नाहीत प्रस्ताव धूळखात : सावंतवाडी रूग्णालयातील प्रकार
By Admin | Updated: May 14, 2014 00:17 IST2014-05-14T00:17:16+5:302014-05-14T00:17:34+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी कुटीर रुग्णालयाची इमारत संस्थानकालीन असून ती जीर्ण झालेली आहे. कर्मचारी व अधिकार्यांच्या निवासस्थानांचीही

अधिकार्यांना घरेच नाहीत प्रस्ताव धूळखात : सावंतवाडी रूग्णालयातील प्रकार
सावंतवाडी : सावंतवाडी कुटीर रुग्णालयाची इमारत संस्थानकालीन असून ती जीर्ण झालेली आहे. कर्मचारी व अधिकार्यांच्या निवासस्थानांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी सावंतवाडी सार्वजनिक विभागाकडून ५२ लाख ९८ हजार रुपयांचा प्रस्ताव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान संचालकांकडे पाठविला आहे. या प्रस्तावांतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख ७४ हजार ८०६ रुपये, ५० खाटांच्या नवीन इमारतीवर पावसाळी छप्पर उभारण्यासाठी १० लाख ८१ हजार रुपये, वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने दुरुस्तीसाठी ८ लाख रुपये, ५० खाटांच्या नवीन इमारतीच्या मागील बाजूला ब्लॉक फ्लोअरिंग बांधणे ५ लाख १७ हजार, कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसाठी ९ लाख ९८ हजार व नवीन विद्युत ट्रान्समीटर बसविण्यासाठी २ लाख ९४ हजार, स्त्री कक्ष व प्रसुती कक्ष विभागाच्या छप्पर दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, कुटीर रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ व आॅथोपेडीक सर्जन या पदावर वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे अधिकारी कामावर हजर नसल्याचे माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या माहितीत उघड झाले आहे. तर आयपीएचएस अंतर्गत रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेले काही विशेषतज्ज्ञ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध नसतात, अशी माहिती समोर आली आहे. याबरोबरच या रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांच्या १३ पदांपैकी केवळ नऊ पदेच भरली असून चार पदे रिक्त आहेत. भरलेल्या पदांवरीलही डॉक्टर गैरहजर आहेत. रिक्त पदे आणि गैरहजर डॉक्टरांबाबतचा प्रस्ताव पाठवूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. ट्रामा केअर सेंटर मंजूर असून त्याचे कामही सुरू झालेले आहे. मात्र, ट्रामा केअर युनिटसाठी लागणारी सीटी स्कॅन यंत्रणा मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. तर रुग्णालयाच्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या कार्यक्रमातून सीटी स्कॅन, क्ष-किरण यंत्र सोनोग्राफी या खासगी एजन्सीद्वारा देण्यासाठीही निर्णय झाले आहेत. मात्र, यावर अद्याप उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने या समस्या सोडविल्यास येथे असणार्या अधिकार्यांना रूग्णालयात दाखल होणार्या रूग्णांना चांगल्या सुविधा देता येतील आणि रूग्णांची परवडदेखील थांबेल. (वार्ताहर)