बालगृहाच्या चौकशीचे बालविकासमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: November 5, 2014 00:02 IST2014-11-04T21:37:07+5:302014-11-05T00:02:59+5:30

मंडळाचे अध्यक्ष नकुल पार्सेकर

Request for Balbhuri inquiry child development committee | बालगृहाच्या चौकशीचे बालविकासमंत्र्यांना निवेदन

बालगृहाच्या चौकशीचे बालविकासमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी : सिंधुदुर्गसाठी जिल्हा मुख्यालयात मंजूर झालेल्या शासकीय निरीक्षण आणि बालगृहाच्या उभारणीस विलंब होत असल्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी महिला आणि बालविकासच्या जिल्हा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुुुदुर्गनगरी येथे ५५३० चौरसमीटर एवढी जागा प्राधिकरणाने सुमारे २० वर्षांपूर्वी महिला आणि बालविकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय निरीक्षण बालगृहासाठी प्रस्तावित केली होती. बालगृहाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला महिला व बालविकास खात्याकडून २०११ ते २०१३ या कालावधीत ३ कोटी ७१ लाखांहून अधिक निधी वर्ग केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे २५ लाख खर्च करून संबंधित जागेवर कंपाऊंड बांधण्यापलिकडे कोणतेही काम केलेले नाही. बालगृहासाठी रक्कम आगाऊ आकारूनही बालगृहाच्या बांधकामास विलंब का झाला, याची चौकशी करण्याची मागणी पार्सेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याचबरोबर ओरोस येथील विद्यमान बालगृह हे २०११ पासून दरमहा १६,५०० एवढ्या भाडेतत्वार घेतले आहे. बालगृहाची ही इमारत धोकादायक बनली आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत. अशा धोकादायक इमारतीत २६ मुले जीव मुठीत धरून राहतात. संबंधित इमारत मालकाने ही इमारत खाली करायला सांगितली आहे.
आपण गेल्या जूनमध्ये महिला बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे या गंभीर प्रकरणाबाबत लक्ष देण्याची विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. शासनाने हक्काचे बालगृह लवकरात लवकर बांधून द्यावे, अशी मागणी पार्सेकर यांनी केली आहे. लवकरात लवकर शासनाने हे बालगृह सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Request for Balbhuri inquiry child development committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.