वैद्यकीय अधिकारी बदला

By Admin | Updated: November 7, 2014 23:39 IST2014-11-07T21:47:57+5:302014-11-07T23:39:52+5:30

मागणीचा ठराव : देवगड पंचायत समितीची बैठक

Replace Medical Officer | वैद्यकीय अधिकारी बदला

वैद्यकीय अधिकारी बदला

देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कार्यक्षम नसून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने त्यांच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव सभागृहासमोर आणण्यात आला व तशी जोरदार मागणी करण्यात आली.
देवगड ग्रामीण रूग्णालयाला उच्च दर्जा मिळूनही येथे रूग्णसेवा सुधारत नाही, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होऊनही त्याची चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याबद्दल पंचायत समिती सदस्या व भाजपा गटनेते संतोष किंजवडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा किसानभवन सभागृहात शुक्रवारी झाली. यावेळी दाभोळे बौद्धवाडी येथील विंधन विहिरीचा प्रलंबित प्रश्न व महावितरणचे अधिकारी सभेला गैरहजर राहण्याचा प्रश्नही त्यांनी लावून धरला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती डॉ. स्मिता राणे आदी उपस्थित होते.
सहाय्यक गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी प्रभारी सचिव म्हणून काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या बंधुंना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी यांच्या अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच अंधेरीचे आमदार अमित साटम यांच्याही अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
देवगड तालुक्यामध्ये स्वतंत्र सर्व्हे होऊन महावितरणच्या विद्युतवाहिन्या कोणकोणत्या घरांवरून गेल्या आहेत व कोठे धोकादायक परिस्थिती आहे याचा शोध घेण्याचे सभापती सारंग यांनी निर्देश दिले. तसेच आधी घर होते की विद्युतवाहिनी? याचेही निरीक्षण या चौकशीत नमूद करावे, असा निर्देशही त्यांनी दिला. देवगडात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्याबाबत त्वरित पावले उचलण्याची मागणी पंचायत समिती सदस्या हर्षा ठाकूर यांनी केली. तर रस्त्याच्या कडेचे वाढलेले गवत व झाडेझुडपे तत्काळ काढून टाकण्यासाठी कारवाईची मागणी रवींद्र जोगल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यासंदर्भातील चर्चेत केली.
पशुपालन विभागातर्फे नवीन पशुपालन स्किमचे परिपत्रक वाचून दाखविताना संबंधित अधिकाऱ्यांनी ४० शेळ््या व २ बोकड यांच्या संचासाठी ३ लाख रूपयांचा प्रस्ताव व त्यांना ५० टक्के अनुदानासाठी प्रस्ताव देण्याचे सर्व सदस्यांना आवाहन केले. १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्वच्छता अभियानाची माहितीही यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सभासदांना दिली. (प्रतिनिधी)

दाभोळेत विंधन विहिरींचा प्रश्न प्रलंबित
दाभोळे बौद्धवाडी येथील विंधन विहिरीचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित असताना व तशी वस्तुस्थिती असताना संबंधित प्रशासनाने काम सुरू असल्याचे उत्तर दिले आहे. ते धादांत खोटे असून सभापती सारंग यांनी स्वत: या भागाला भेट देऊन खात्री करावी, अशी मागणी संतोष किंजवडेकर यांनी केली. यावर सभापतींनी चौकशी व प्रत्यक्ष भेट देण्याचे मान्य केले. यावेळी प्रत्येक गावासाठी एक स्वच्छता सहाय्यक असावा, सक्षम कृषी सहाय्यक अधिकारीही या तालुक्यासाठी नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Replace Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.