देवदर्शनासाठी आलेल्या आरामबसला अपघात; ४६ जखमी; सहा गंभीर
By Admin | Updated: December 23, 2016 23:14 IST2016-12-23T23:14:17+5:302016-12-23T23:14:17+5:30
करबुडे येथील घटना : सर्व जखमी भिवंडीतील

देवदर्शनासाठी आलेल्या आरामबसला अपघात; ४६ जखमी; सहा गंभीर
रत्नागिरी : गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे देवदर्शनासाठी जाणारी आरामबस पलटी होऊन झालेल्या अपघातात ४६ प्रवासी जखमी, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.१५च्या सुमारास करबुडे फाटानजीक घडली. या अपघातातील सर्व जखमी दांभाडे (भिवंडी, ठाणे) येथील राहणारे आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
भिवंडी येथील दांभाडे गावातील ४६ प्रवासी आरामबसने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी येत होते. संतोषकुमार नाहक हा आपल्या ताब्यातील आराम बस (एमएच-०५-एझेड- ६५५) घेऊन शुक्रवारी सकाळी ५च्या सुमाराला दांभाडे येथून निघाला. दुपारी ३.५० सुमारास ही आराम बस मुंबई - गोवा महामार्गावरील निवळीहून गणपतीपुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. करबुडे फाटा येथील वळणावर ही गाडी आली असता चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाली.
गाडी पलटी होताच सुमारे ३० फूट फरपटत गेली. अपघाताची माहिती मिळताच करबुडे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्याला सुरुवात केली. तेथीलच ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
गंभीर जखमी : या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी सुमता कातर भुई (६५), शुभम दिनेश शैलार (८), प्रणय पंडित ठाकरे (११), संतोष कुमार नाहक (३५) यांची नावे कळली असून, उर्वरीत दोघांची नावे अद्याप कळलेली नाहीत.