देवगडच्या स्पंदन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरचे रजिस्ट्रेशन रद्द
By Admin | Updated: November 28, 2014 00:10 IST2014-11-27T22:36:36+5:302014-11-28T00:10:16+5:30
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार कारवाई--जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

देवगडच्या स्पंदन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरचे रजिस्ट्रेशन रद्द
देवगड : देवगड येथील स्पंदन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरवर गुरूवारी सायंकाळी जिल्हा समुचित प्राधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार कारवाई करून सेंटरचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले. तसेच या सेंटरमधील सोनोग्राफी मशीन, त्यासंबंधी कागदपत्रे व रेकॉडर््सही सील करण्यात आले.
पीसीएनडीटी कायद्यानुसार देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक भिसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिनिधी डॉ. डी. व्ही. करंबेळकर, वकील डी. डी. धुरी, नायब तहसीलदार अशोक शेळके, देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली. एखाद्या हॉस्पिटलतील सोनोग्राफी सेंटरवर रद्द करण्याची कारवाई होण्याची जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
देवगड सडा भागातील देवगड-निपाणी मार्गावरील स्पंदन हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसह अन्य उपचार पद्धतीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारींवरून या संदर्भातील आरोग्य विभागाची गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र म्हणजेच (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायद्याच्या १९९४ सुधारीत २००३ अंतर्गत २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यावेळी स्पंदन हॉस्पिटलविरूद्ध सादर झालेल्या कागदपत्रांच्या आधारे या केंद्राची नोंदणी रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसे आदेश देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक भिसे यांच्याकडे पत्राद्वारे पाठविण्यात आले. त्यानुसार ही कारवाई झाली.
या कारवाईमध्ये स्पंदन हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले असून त्यासंबंधी कागदपत्रे व रेकॉडर््सही सील करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. अशोक भिसे यांनी दिली.
तसेच हे सेंटर चालविणाऱ्या स्पंदन हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीमध्येही अनियंत्रितता आढळल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी अशी माहिती देण्यात आली की, सोनोग्राफी सेंटरची त्रैमासिक व मासिक तपासणी जिल्हास्तरावरून केली जाते. त्यामध्ये त्रुटी आढळल्याने जिल्हास्तरावर ही कारवाई करण्याचे निश्चित झाले होते.
याबाबत आता पुढील तपास व कारवाई करून त्याचे विस्तृत अहवाल देवगड दिवाणी न्यायालयासमोर सादर करण्यात येईल व रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती डॉ. अशोक भिसे यांनी दिली. जिल्हा समुचित प्राधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीपुढेही या कारवाईची माहिती व अहवाल पाठविला जाणार असून ती समिती याबाबत आपले मत नोंदविणार आहे. पुढील प्रशासकीय स्तरावरील कारवाईची शिफारसही होईल, असे सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील
पहिलीच कारवाई
जिल्हास्तरावरील एखाद्या रूग्णालयावरील ही पहिलीच कारवाई असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याचे कायदेशीर परिणामही काय होतील? याकडे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.