रिमझिम पावसाने बागायतदार धास्तावले
By Admin | Updated: February 28, 2015 23:28 IST2015-02-28T23:27:01+5:302015-02-28T23:28:17+5:30
कणकवली, देवगडसह कुडाळ भागात शिडकावा

रिमझिम पावसाने बागायतदार धास्तावले
पुरळ : वारंवार समस्येच्या गर्तेत असलेल्या आंबा बागायतदारांसमोर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचे संकट आले असल्याने आंब्यावर अनेक रोग फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला.
कणकवली, कुडाळ, देवगड परिसरात शनिवारी सकाळी काळे ढग भरून आले आणि काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. बुरशीचे संकटही उभे ठाकले असून, आंबा पिकाला अनेक रोगांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती माहिती घेऊन आंबा फवारणी हाताळली पाहिजे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. तीन टप्प्यांत येणारा मोहोर यावर्षी पाच टप्प्यांत येऊन वारंवार फूट झाल्याने सुरुवातीच्या आंब्यांची गळ होत राहिली. याचा फटका बऱ्याचशा प्रमाणात आंबा बागायतदारांना बसला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता थ्रीप्स, तुडतुडे व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
युरोपीय राष्ट्रांनी आंब्यावरील बंदी उठविल्यामुळे आंब्याला मागणी वाढणार आहे. यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार समाधानी होता. मात्र, बागायतदारांच्या समाधानावर अवेळी पडणाऱ्या पावसाने विरजण टाकले आहे.
फळधारणा झालेल्या आंब्यांवर डाग पडण्याची शक्यता आहे. मोहोर असलेल्या कलमांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकते. हा मोहोर पावसाच्या पाण्याने काळा पडून त्याठिकाणी फळधारणा होत नाही. यावर्षी बऱ्याच प्रमाणात कीटकनाशकांच्या अतिरिक्त फवारण्या करण्यात आल्या. त्यामुळे आंबा मोहोरावर फळधारणा होण्यासाठी होणारे परागीकरण झाले नसल्याने शेवटच्या टप्प्यातील आलेल्या मोहोराला फळधारणा झाली नाही.
यामुळे कृषी सल्ल्यानुसार बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविण्यासाठी बागायतदारांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रिमझिम पाऊस पडत राहिला तर आंबा पीक यावर्षी संपुष्टात येण्याची भीती आहे, तर पावसाबरोबर वारा सुटल्यास फळधारण झालेल्या आंब्याची गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानीही होऊ शकते. या शक्यतांनी आंबा बागायतदार सध्या चिंतातुर झाले आहेत. (वार्ताहर)