भरती बंदचा फटका...

By Admin | Updated: July 24, 2015 00:39 IST2015-07-23T21:58:49+5:302015-07-24T00:39:18+5:30

गंभीर प्रश्न : शिक्षक भरती रखडल्याने जामीनदारांची वानवा

Recruitment shutdown ... | भरती बंदचा फटका...

भरती बंदचा फटका...

आनंद त्रिपाठी - वाटूळ -महाराष्ट्र शासनाने मे २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणल्याने शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षक व सेवकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढी कार्यरत असून, अनेक कर्मचाऱ्यांची नाळ या पतपेढीशी जोडली गेली आहे. शिक्षक भरती रखडल्याचा मोठा फटका आता पतपेढीच्या शिक्षक सेवक सभासदांनाही बसू लागला आहे.
जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील एक हजाराच्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, जवळपास एवढेच कर्मचारी ३ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक पतपेढीमध्ये दोन शिक्षक वा सेवक जामीनदार म्हणून एका कर्जदाराला लागतात. परिणामी जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते शाळेमध्ये सहकाऱ्याला जामीनदार असतात. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या कर्जदाराला अन्य जामीनदार बदलून द्यावा लागतो. परंतु गेल्या ३ वर्षांपासून भरती प्रक्रियाच बंद असल्याने पतपेढीमध्ये नवीन सभासदांची संख्या वाढली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात नवीन जामीनदार देण्यासाठी अनेक शाळांमध्ये सभासदच शिल्लक नसल्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पतपेढीची नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय त्यांची पेन्शन केस पूर्णच होत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सभासदवर्गातून होत आहे. जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरणार कधी? हा प्रश्न भेडसावत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची संख्या मोठी आहे. शिक्षक भरती रखडल्याचा परिणाम मोठा असून, तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पतपेढीतून कर्ज घेणाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, हा सारा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.

Web Title: Recruitment shutdown ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.