बंडखोर अखेर रिंगणाबाहेर
By Admin | Updated: January 7, 2015 23:54 IST2015-01-07T22:40:56+5:302015-01-07T23:54:52+5:30
लांजा नगरपंचायत : अर्ज मागे घेण्याच्या अखेरीसही हेका कायम

बंडखोर अखेर रिंगणाबाहेर
लांजा : लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाल्याने त्यांची मनधरणी करुनही पक्षातील पदाधिकारी बंडखोरांना थंड करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही बंडखोरांनी आपला पवित्रा बदलण्यास नकार दिला. म्हणून निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होणार आहे.
निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही कामाला लागा, असा आदेश मिळाल्याने व प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत असतानाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तसेच अर्ज छाननीच्या दिवशी पक्ष आपल्या अर्जाचा विचार करेल, अशी भावना असणाऱ्या बंडखोर उमेदवारांना ए बी फॉर्म पक्षाने न दिल्याने आपले अर्ज कायम ठेवून निवडणूक अपक्ष लढवण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करुन अर्ज मागे घेतले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, बंडखोरांनी आपला निर्णय ठाम ठेवल्याने ८ प्रभागात बंडखोर आपल्या बंडाचे निशाण हाती घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग १ मधून चौरंगी लढत होत असली तरी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग २ मधून तिरंगी लढत होत असली तरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. प्रभाग ३ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मात्र, सेनेचा बंडखोर उभा आहे. प्रभाग ४ मध्ये चौरंगी लढत होत असून, सेनेतूनच बंडखोरी केली आहे. प्रभाग ५ मधून चौरंगी लढत होत असली तरी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग ६ मध्ये तिरंगी लढत असून, या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही.
प्रभाग ७ मध्ये तिरंगी लढत होत असून या ठिकाणी राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केलेला नाही. प्रभाग ८ मध्ये तिरंगी लढत होत असून, सेनेच्या अधिकृत उमेदवाराने अपक्षाला पाठिंबा दिला असल्याचे समजते. प्रभाग ९ मधून चौरंगी लढत होत आहे. येथे भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रभाग १० मधून चौरंगी लढत होत आहे. प्रभाग ११ मध्ये चौरंगी लढत, प्रभाग १२ मधून चौरंगी लढत होणार, प्रभाग १३ मधून सेनेत बंडखोरी तसेच काँग्रेसमध्येदेखील बंडखोरी झाली असून सर्वात जास्त उमेदवारांनी या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.येथे चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग १४ मध्ये चौरंगी लढत, प्रभाग १५ मध्ये तिरंगी लढत, प्रभाग १६ मध्ये तिरंगी लढत, प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागे घेतल्याने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला असून, येथे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी दोघात लढत होणार आहे. निवडणूक जवळ येत असल्याने नगरपंचायत निवडणुकीत सारेच उमेदवार कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)