बंडखोरांचा बँडबाजा
By Admin | Updated: October 5, 2014 23:12 IST2014-10-05T22:02:52+5:302014-10-05T23:12:31+5:30
रंग राजकारणाचे

बंडखोरांचा बँडबाजा
जे आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला मिळाले नाही की माणूस बंड करतो. राजकारणात तर जे आपल्या हक्काचं आहे, असं फक्त आपल्याला वाटतं त्यासाठीही बंडखोरी केली जाते. इंग्रज भारतात असताना बंड या शब्दाला देशभक्तीचा अर्थ जोडला जात होता. आता मात्र या शब्दाचा अर्थ पार बदलून गेला आहे. उठसूठ कोणीही बंड करतो, असं सध्याचं वातावरण आहे आणि तेही राजकारणात. आवश्यक त्या ठिकाणी बंड करण्याची वृत्ती आपण कधीच सोडून दिली आहे. आता बंड होतात ती फक्त राजकारणातच आणि तीही निवडणुका आल्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकांचा इतिहास पाहिला तर आजवर रत्नागिरीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याच उमेदवाराचं बंड यशस्वी झालेलं नाही. आजपर्यंत प्रत्येक बंडखोर आपटलाच आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार कायम पक्षाच्याच पाठी उभा राहिला आहे. अर्थात बंडखोरी करताना स्वत: निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्याचा उद्देशच अधिक असतो. बंडखोरीच्या साथीची सर्वात मोठी लागण आहे ती काँग्रेसमध्ये. १९८० साली रत्नागिरीमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जड्यार यांच्याविरोधात माजी आमदार हसनैन यांनी बंडखोरी केली. त्यामुळे भाजपच्या कुसुमताई अभ्यंकर विजयी झाल्या. जड्यार आणि हसनैन यांच्या मतांची बेरीज कुसुमतार्इंच्या मतांपेक्षा खूप अधिक होती. म्हणजेच बंडखोरी झाली नसती तर जड्यार निवडून आले असते. त्याचवर्षी दापोलीत डॉ. चंद्रकांत मोकल यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेसचे रामचंद्र बेलोसे पराभूत झाले आणि जी. डी. सकपाळ विजयी झाले. डॉ. मोकल-बेलोसेंची मते सकपाळ यांच्यापेक्षा अडीच हजाराने अधिक होती. १९९० साली हा प्रकार जास्तच अनुभवास आला. रत्नागिरीत शिवाजीराव जड्यार यांच्या विरोधात कॅ. प्रमोद साळवी अपक्ष उभे राहिले. त्यामुळे जड्यार पराभूत झाले आणि शिवाजीराव गोताड विजयी झाले. जड्यार-साळवींची मते गोताड यांच्यापेक्षा दहा हजाराने अधिक होती. चिपळुणात बाळासाहेब माटेंनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निशिकांत तथा नाना जोशी पराभूत झाले. खेडमध्ये केशवराव भोसलेंनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसचे तु. बा. कदम पराभूत झाले. १९९५ साली रत्नागिरीमध्ये रवींद्र सुर्वेंना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना कुमार शेट्येंनी बंडखोरी केली आणि शिवाजीराव गोताड विजयी झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत जेव्हा-जेव्हा बंडखोरी झाली, तेव्हा -तेव्हा पराभव पत्करावा लागणारा उमेदवार काँग्रेसचाच होता. बंडखोरीचे प्रमाण काँग्रेसमध्येच अधिक होते. कारण १९९९पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती भक्कम होती. त्यामुळे सर्वाधिक बंडखोरी याच पक्षात झाली आहे. १९९९पासून जिल्ह्यातील सर्वात स्ट्राँग पक्ष म्हणून शिवसेना-भाजप युती पुढे आली. तेव्हापासून काँग्रेसमधील बंडखोरी कमी झाली आणि शिवसेनेत वाढू लागली. १९९९ साली शिवसेनेच्या विजयराव तथा आप्पा साळवी यांनी राजापूर मतदार संघात बंडखोरी केली. तरीही शिवसेनेचे गणपत कदम आरामात निवडून आले. शिवसेनेच्या सुभाष बने संगमेश्वर मतदार संघात बंडखोरी केली. तरीही सेनेचेच रवींद्र माने निवडून आले. गुहागरमध्ये भाजपची जागा असतानाही शिवसेनेच्या महेंद्र कापडी यांनी बंडखोरी केली. पण भाजपचे डॉ. विनय नातू आरामात विजयी झाले. २००९च्या निवडणुकीत मतदार संघांची पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत खेड मतदारसंघ बाद झाल्यामुळे शिवसेनेच्या रामदास कदम यांना गुहागर मतदार संघात उमेदवारी दिली गेली. त्यामुळे तेथील भाजपचे तत्कालीन आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केली. आताच्या म्हणजे २०१४च्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावण्यास सुरूवात केली असल्याने यावेळी तुलनेने बंडखोरी कमी आहे. यावेळी केवळ दापोली मतदार संघातच बंडखोरी झाली आहे. तेथील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी संजय कदम यांच्याविरोधात बंड केले आहे. पक्षाने संजय कदम यांना अधिकृत उमेदवारी दिल्यामुळे देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास आहे की, आजपर्यंत कुठल्याही मतदार संघात एकही बंडखोर उमेदवार निवडून आलेला नाही. तीच प्रथा याहीवेळी कायम राहणार की बदलणार, याचं उत्तर १९ तारखेलाच मिळेल.
मनोज मुळ्ये