पाठपुराव्यामुळेच रत्नागिरीचे प्रश्न सुटले

By Admin | Updated: December 30, 2015 00:44 IST2015-12-29T22:27:39+5:302015-12-30T00:44:21+5:30

राजन साळवी : ‘लोकमत’ कार्यालयात मनमोकळी चर्चा

Ratnagiri's questions have been solved due to follow-up | पाठपुराव्यामुळेच रत्नागिरीचे प्रश्न सुटले

पाठपुराव्यामुळेच रत्नागिरीचे प्रश्न सुटले


कोकणातील आंबा, काजू नुकसानभरपाई, मच्छिमारांच्या समस्या, आॅनलाईन सातबाराचा घोळ, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न, प्रकल्पासाठीचा लढा, एस. टी. स्थानकातील पानस्टॉल समस्या यांसारखे अनेक प्रश्न आक्रमकपणे मांडत आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेची बुलंद तोफ बनून विधीमंडळ अधिवेशने गाजवली. नागपूर अधिवेशनानंतर सोमवारी लोकमत कार्यालयाला भेट देऊन त्यांनी आपले अनुभव कथन केले.

राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना रत्नागिरीसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विकासकामांसाठी हिरीरीने सरकार दरबारी लढणारे, विधिमंडळाच्या मुंबईतील व नागपूर हिवाळी अधिवेशनातही तितक्याच आक्रमकतेने जनतेच्या समस्या मांडून त्याबाबत निर्णय मिळवणारे, लोकांना न्याय देणारे आमदार राजन साळवी हे शिवसेनेची राज्यातील एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात. नागपूर अधिवेशनात त्यांनी रत्नागिरीच्या विविध समस्या आग्रहपूर्वक मांडल्या. समस्या सोडवण्यात यश मिळविलेल्या आमदार साळवी यांनी सोमवारी (२८ डिसेंबर २०१५) रत्नागिरीच्या ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली व विधिमंडळात मांडून सोडविलेल्या समस्यांबाबत संवाद साधला.
प्रश्न : कोकणसाठी महत्त्वाच्या असलेल्या आंबा-काजू नुकसानभरपाईबाबत नेमके काय प्रयत्न केले ?
उत्तर : गतवर्षीच्या हंगामात आंबा, काजूचे नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळण्यासाठी कोकणातील आमदारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र, सातबारावर अनेक वारसदार असल्याने कसणाऱ्याला भरपाई मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील चार जिल्ह्यांना शंभर कोटींची नुकसानभरपाई शासनाने मंजूर केली होती. मात्र, संमतीपत्राच्या वादात ही भरपाई अडकली अन् निधी परत जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर बागायतदारांची बाजू अधिवेशनात मांडली. मुख्यमंत्री देवें्रद फडणवीस यांनीही त्याला मान्यता दिली. आता हमीपत्रावर ही भरपाई वितरीत केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनादेश येईल. पाठपुरावा केला तर कामे होतात यावर माझा विश्वास आहे.
प्रश्न : आॅनलाइन सातबाराबाबतही आपण भूमिका मांडली, नेमके काय निष्पन्न झाले?
उत्तर : जिल्ह्यातही आॅनलाइन सातबारा योजना लागू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट नाही तर त्या लोकांना सातबारा मिळणार कसे? याकडे आपण अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील जनतेची ही गंभीर स्वरुपाची समस्या आहे, हे लक्षात घेऊन आॅनलाइन सातबारा मिळत नसेल तर हस्तलिखित स्वरुपात द्यावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश निघाला आहे. इंटरनेट नसलेल्या भागातील लोकांना याचा लाभ होणार आहे.
प्रश्न : अन्य कोणत्या प्रश्नांवर आपण शासनाचे लक्ष वेधले व ते सोडविण्यात यश मिळविले ?
उत्तर : पारंपरिक व पर्ससीन नेट मच्छिमारी ही ठरलेल्या अंतराच्या मर्यादेत व्हावी. पारंपरिक मच्छिमारांना त्याचा त्रास होता नये, याबाबतही योग्य निर्णय होणार आहे. एस. टी. स्टँडवरील पान स्टॉलवर थंड पेय, खाद्य, अन्य वस्तू विक्रीला परवानगी मिळवून घेतली. एस. टी. भरतीत नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र नसलेल्या विदर्भासह रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ जणांना न वगळण्याचा निर्णय झाला आहे. शासकीय सेवेतील ६० सुरक्षारक्षकांपैकी २३ जणाना शिक्षण, उंची छाती या मुद्द्यांवरून नोकरीतून न काढण्याचा निर्णयही आपल्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीचा धोका टळला आहे.
मंत्रीपद मिळालेच तर क्षमता नक्की सिध्द करीन
लाल दिवा काय आज असेल, उद्या नसेल... परंतु एक शिवसैनिक म्हणून सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मिळालेले आशीर्वाद, त्यांनी दिलेला विश्वास व उध्दवजींचे मिळत असलेले प्रेम यापेक्षा माझा मोठा सन्मान आणखी काय असू शकतो? हे आशीर्वाद व प्रेम माझ्यासाठी लाल दिव्याहून मोलाचे आहे. संघटनेत काम करीत असताना कोणाला मंत्रीपद द्यावे वा अन्य कोणते पद द्यावे, हा सर्वस्वी पक्षप्रमुख उध्दवजींचा अधिकार आहे. संघटनेत काम करताना आपल्याला मंत्रीपद मिळालेच तर त्या पदाला न्याय देण्यासाठी क्षमता नक्कीच सिध्द करीन. पक्षप्रमुख व संघटनेला अभिनान वाटावा, असे काम करीन. माझा विश्वास आहे, संघटनेत योग्यवेळी त्या त्या संैनिकाला पक्षप्रमुख नक्की संधी देतात. ती मागण्याची गरज अजिबात नाही, असे आमदार राजन साळवी म्हणाले.
बाळासाहेबांनी दिलेली अंगठी...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सैनिक म्हणून विश्वास टाकल्यानंतर माझ्या सामाजिक कामात यश मिळावे म्हणून स्वत: देवाच्यासमोर उभे करून मला देवाच्या साक्षीने अंगठी दिली. ही अंगठी आजही माझ्या हातात मी जपली आहे. मला प्रेरणा देणारी ही अंगठी हा त्यांचा प्रेमळ सहवासच आहे.

 

- प्रकाश वराडकर

Web Title: Ratnagiri's questions have been solved due to follow-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.