रत्नागिरीत राजकीय उकाडा सुरु

By Admin | Updated: October 30, 2015 23:14 IST2015-10-29T23:44:51+5:302015-10-30T23:14:48+5:30

सभांचा दिवस : रत्नागिरी नगर परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गती

In the Ratnagiri, the state government started | रत्नागिरीत राजकीय उकाडा सुरु

रत्नागिरीत राजकीय उकाडा सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग दोन व प्रभाग चारमधील प्रत्येकी दोन जागांसाठी १ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे नेते. कार्यकर्ते प्रचारात दंग असून, प्रचारसभांनी रत्नागिरीतील राजकीय उकाडा अधिकच वाढविला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यातच खरी झुंज होत असल्याने स्पष्ट झाले आहे. गद्दारीचा मुद्दा हा सर्वात प्रथम क्रमांकावर असून, उदय सामंत तसेच चार नगरसेवकांच्या गद्दारीवरून राष्ट्रवादीने प्रचारात रान पेटवले आहे. उमेश शेट्ये यांच्या कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीत तेथे कोंडी होत असल्याने शिवसेनेत व तेथेही जाच होत असल्याने पुन्हा राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबाबतचाही मुद्दा प्रचारात त्यांच्या विरोधकांकडून उठविला जात आहे.
शिवसेनेचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी, तर उमेश शेट्ये यांच्या जुन्या प्रकरणांतील गैरव्यवहारांची मालिकाच सादर करून शेट्येंची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकरणात शेट्ये हे अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीतच पराभूत करून अपात्र ठरवा, असे आवाहन ते करीत आहेत. दुसरीकडे शांतपणे प्रचार करणाऱ्या भाजपाचे नेते बाळ माने यांनी उदय सामंत व उमेश शेट्ये हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, गद्दारीचा हा वारसा रत्नागिरीतून संपवावा व भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
सर्वच पक्षांनी एकमेकांबाबत आरोपांचा जागर केला आहे. त्यातून नागरिकांच्या डोक्यात कोण गेले व हातात कोण आहेत हे आता निवडणुकीत ठरणार आहे. या पोटनिवडणुकांमध्ये प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, राजकीय रंगही प्रचाराला चढू लागले आहेत. (प्रतिनिधी)


तटकरे : गद्दारांचा ढोल वाजवा
रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी होतील व भास्कर जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे ते विजयी मिरवणुकीसाठी २ नोव्हेंबरला रत्नागिरीत येतील. तेव्हा त्यांनी त्यांच्या गावातील उत्सवाप्रमाणे येथील मिरवणुकीतही ढोल वाजवावा व गद्दारांचाही ढोल वाजवावा, असे तटकरे म्हणाले. सेना व भाजपचे लोक एकमेकांचे कपडे फाडण्यातच गुंग आहेत. त्यांना विकासाशी काही देणेघेणे नाही, अशी बोचरी टीकाही सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केली.

जोरदार प्रचार
राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेने गुरुवारी जोरदार प्रचार केला. भाजपने जाहीर सभा घेतली नसली तरी घरगुती प्रचारावर भर दिला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे.


शिस्त मानणारा मी कार्यकर्ता
पक्षाची शिस्त मानणारा मी कार्यकर्ता आहे. गद्दारांचे काय होते, ते या दगाबाजाच्या सध्या झालेल्या स्थितीवरून दिसून येत आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. इतर पक्षात गेलेल्या राष्ट्रवादीतील दगाबाजांची स्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा केवळ नगर परिषद निवडणुकीतच नव्हे, तर पुढील कोणत्याही निवडणुकीत काहीच परिणाम होणार नाही, असे जाधव यांनी सांगितले. अशा गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.

तटकरेंनी यांना मांडीवर घेतले...
राष्ट्रवादीत हा गद्दार नेहमी पुढे पुढे मिरवायचा. शिवसेनेत त्याचे मांजर झाले आहे. तटकरे साहेबांनी याला खांद्यावर नव्हे; मांडीवर घेतले होते. हा नेहमी म्हणायचा, माझ्याकडे लक्ष ठेवा, माझ्याकडे लक्ष ठेवा. ज्यांनी ज्यांनी याच्याकडे लक्ष ठेवले, त्याला त्याला याने फसवले, असे सांगतच जाधव यांनी तटकरेंकडे अंगुलीनिर्देश केला. त्यामुळे सभेत हास्याचे कारंजे फुलले. गद्दारीविरोधात घोषणा देण्यात आल्या.


पालकमंत्र्यांबाबत कधी तक्रार नाही
राज्यात आघाडीचे सरकार असताना माझ्याकडे साडेतीन वर्षे मंत्रीपद होते. मात्र, मंत्रीपद स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासून या दगाबाज माणसाने माझ्याविरोधात तक्रारींचे सत्र सुरू केले. तक्रारींचा ढीग तयार झाला. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. साडेतीन वर्षानंतर पक्षाध्यक्षांनी याला राज्यमंत्री केले. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले. त्यानंतर काही काळातच माझ्याकडे कॅबिनेटमंत्रीपद आले. मात्र, मी कधीच तक्रार केली नाही. कॅबिनेट मंत्री असल्याने पालकमंत्रीपदावर माझा अधिकार होता तरी यांच्याकडे असलेल्या पालकमंत्रीपदाबाबत कधी तक्रार केली नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.


स्वाभिमानी विरुध्द बेईमान : तटकरे
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांसाठी १ नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक ही स्वाभिमानी व बेईमानी यांच्यातील निर्णायक लढाई आहे. त्यामुळे या निवडणुकीत रत्नागिरीवासीयांनी गद्दाराने निर्माण केलेल्या गद्दारीच्या परंपरेला गाडून टाकावे व राष्ट्रवादीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे आज केले.
राजिवडा येथील कॉँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. रत्नागिरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट स्थापन केला होता. मात्र, त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा भंग झाला. परिणामी हे चारही नगरसेवक अपात्र ठरले. त्यामुळेच येत्या १ नोव्हेंबरला ही पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक लादणाऱ्यांना निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन तटकरे यांनी केले. महामार्गाचे चौपदरीकरण होतेय, ही चांगली बाब आहे. मात्र, मंत्री अनंत गीते अनेक ठिकाणी झालेल्या सभांंतून चौपदरीकरणानंतर टोल आकारला जाणार असल्याचे सांगत आहेत. ही टोल संस्कृती कोकणला मान्य नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


सेना - भाजप एकमेकांचे कपडे फाडताहेत
राज्यात भाजप व सेनेचे सरकार असल्याचे सांगितले जात असले तरी ते खरे नाही, असे सांगत तटकरे म्हणाले, सरकार केवळ भाजपचेच आहेत. सत्तेच्या सर्व चाव्या भाजपच्या हाती आहेत. शिवसेना केवळ भाजपच्या मागे फरपटत गेली आहे. सत्तेत असूनही सत्तेत नाही, अशी विचित्र स्थिती शिवसेनेची झाली आहे. यांचा स्वाभिमान गळून पडला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात अशी कोणती विकासकामे या सरकारने केली, हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: In the Ratnagiri, the state government started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.