स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने
By Admin | Updated: August 1, 2015 00:37 IST2015-07-31T22:35:16+5:302015-08-01T00:37:15+5:30
रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने
रत्नागिरी : देशातील १०० शहरांना स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यासाठी राज्यातील ३० पालिकांची प्राथमिक फेरीत निवड झाली. त्यातून निवडक, सक्षम तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दहा शहरांची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात रत्नागिरी नगरपालिकेचा समावेश नसल्याने रत्नागिरीच्या विकासावर मर्यादा येणार आहेत.विविध अटींबरोबरच स्मार्ट शहरासाठी लोकसंख्येची अटही घालण्यात आली होती. यातील बहुतांश निकषांच्या पातळीवर रत्नागिरी पालिका आघाडीवर होती. मात्र, लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नव्हता. स्मार्ट शहरासाठी १ लाख लोकसंख्येची अट घालण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७६ हजार आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या स्पर्धेत रत्नागिरी टिकेल की नाही, याबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. राज्यातील ३० पालिकांनी स्मार्ट शहरासाठी आपले प्रस्ताव राज्य सरकारकडे मागणीनुसार सादर केले होते. कोकणातील रत्नागिरी व पनवेल या दोन पालिकांकडूनही असे प्रस्ताव शासनाने मागविले होते. आठवड्यापूर्वीच मंत्रालयातील शहर विकास विभागाच्या सचिवांनी स्मार्ट शहरासाठी ३० प्रस्ताव आले असून, छाननीअंती त्यातील १० प्रस्तावाची अंतिम यादी ३१ जुलै २०१५ रोजी जाहीर होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज या दहा शहरांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.
रत्नागिरी पालिकेकडून राज्य शासनाने प्रस्ताव मागविल्याने गेले दोन महिने आवश्यक निकषांची पुर्तता किती व कशी होणार याबाबत विचारमंथन सुरू होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी बैठका झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी दिल्लीतील देशव्यापी मार्गदर्शन शिबिरालाही नगराध्य्
ाक्ष व अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र हे सारे प्रयत्नच फोल गेल्याने रत्नागिरीकरांची आशा धुळीस मिळाली. (प्रतिनिधी)
कोकण विभाग उपाशी...
स्मार्ट शहर प्रकल्पासाठी शहरांची निवड करताना राज्यातील नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा महसुली विभागांना अंतिम १० शहरांच्या यादीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोकण विभागातून पनवेल व रत्नागिरी या दोन शहरांपैकी किमान एका शहराला अंतिम यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोकणच्या हाती काहीच लागले नाही. उलट विकसित असलेल्या मोठ्या शहरांनी बाजी मारली.