रत्नागिरी : महायुती तुटण्याआधीच भाजप, सेनेचे अर्ज दाखल
By Admin | Updated: September 25, 2014 23:27 IST2014-09-25T22:04:09+5:302014-09-25T23:27:01+5:30
दुसरीकडे आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शेखर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

रत्नागिरी : महायुती तुटण्याआधीच भाजप, सेनेचे अर्ज दाखल
रत्नागिरी : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१४ करिता जिल्ह्यात आज, गुरुवारी दापोली (-२६३) विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्र दाखल केली. आज सायंकाळी महायुती तुटल्याची घोषणा झाली अन् सेना-भाजपचा घटस्फोट होण्याआधी दुपारी रत्नागिरीतून भाजपचे सुरेंद्र तथा बाळ माने, राजापूरमधून सेनेचे राजन साळवी, चिपळूणमधून सेनेचे सदानंद चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने वाजत गाजत जाऊन उमेदवारी अर्ज भरले. घटस्थापनेच्यादिवशीच झालेल्या घटस्फोटामुळे आता निवडणुकीत सेना-भाजप आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असताना गुहागरमधून राष्ट्रवादीचे भास्कर भाऊराव जाधव, चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर गोविंदराव निकम यांनी आपले उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. रत्नागिरीत उदय सामंत हे येत्या २७ सप्टेंबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युती तुटल्याने व आघाडीचे बिनसल्यास जिल्ह्यातील सर्वच लढती या चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
अर्ज दाखल करताना सेना-भाजपची दक्षतारत्नागिरी, चिपळूण, राजापूर येथून आज शिवसेनेच्या उमेदवारांनी, तर रत्नागिरीतून भाजप उमेदवाराने विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल केले. त्यावेळी मित्रपक्ष भाजपचे पदाधिकारीच केवळ उपस्थित होते. महायुतीचा निर्णय झालेला नसल्याने भाजपचे कार्यकर्ते सेनेच्या मेळाव्यांना व मिरवणुकीत सहभागी झाले नव्हते. तसेच रत्नागिरीत भाजपचे बाळ माने यांच्या मेळाव्यात केवळ सेनेचे पदाधिकारीच उपस्थित होते. सेनेचे कार्यकर्ते सहभागी नव्हते.