रत्नागिरी शहर एलईडी पथदीपांनी उजळणार !
By Admin | Updated: September 5, 2014 23:26 IST2014-09-05T23:09:49+5:302014-09-05T23:26:47+5:30
पालिकेच्या येत्या सभेत होणार निर्णय : नाशिकच्या कंपनीकडून मोफत प्रकल्प; वीजबिलात होणार ३० टक्के कपात

रत्नागिरी शहर एलईडी पथदीपांनी उजळणार !
प्रकाश वराडकर - रत्नागिरी --शहरातील साडेचार हजार पथदीपांची जागा ३६ ते ४० वॅटचे एलईडी पथदीप घेणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर या एलईडी दीपांनी उजळून निघणार आहे. हे पथदीप मोफत देण्याची तयारी नाशिक येथील ‘करंट टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने दाखविली आहे. रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या कंपनीने या योजनेसाठी निवड केली आहे. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार आहे. पालिकेच्या येत्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे देखभाल केले जाणारे व महावितरणकडून देखभाल होणारे असे साडेचार हजार पथदीप आहेत. या सर्व पथदीपांची जागा हे एलईडी पथदीप घेणार आहेत. साधारणपणे ३६ ते ४० किंवा अन्यत्र आवश्यकतेनुसारच्या क्षमतेचे एलईडी बसविण्याची कंपनीची तयारी आहे. सध्या पालिकेला दर महिन्याला पथदीपांच्या विजेसाठी १२ लाखांचे बिल महावितरणला अदा करावे लागते. एलईडी पथदीप बसविल्यानंतर या वीजबिलात ३० टक्के कपात होणार आहे. हा पालिकेचा फायदाच असून, सात वर्षे ही कमी झालेली बिलाची रक्कम या कंपनीला द्यावी लागणार आहे. सात वर्षांत पथदीपांची देखभाल पूर्णत: कंपनी पाहणार आहे. या योजनेतील सर्व पथदीपांचा खर्च ही कंपनीच करणार आहे. प्रत्येक पथदीपासाठी किमान सहा ते आठ हजारांचा खर्च अपेक्षित असून, साडेचार हजार पथदीपांचा खर्च कंपनीच करणार असल्याने पालिकेसाठी हा प्रकल्प वरदायी ठरणार असल्याचे मयेकर म्हणाले. एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबविताना कंपनी त्याचा उभारणी खर्च स्वत:च उचलणार आहे, यामागे नेमके काय कारण आहे, असे विचारता मयेकर म्हणाले, एलईडी दिव्यांना पावसाच्या पाण्यामुळे समस्या येते, असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस असलेल्या कोकणातील रत्नागिरी शहरात हा प्रकल्प राबवून तो यशस्वी करून दाखविण्याचा कंपनीचा मानस आहे. याद्वारे राज्यातील व देशातील अन्य भागांना या प्रकल्पाचा आदर्श घालून देण्याचा कंपनीचा मानस आहे.