रत्नागिरी एपीएलधारक धान्यापासून वंंचित
By Admin | Updated: August 25, 2014 22:52 IST2014-08-25T22:19:50+5:302014-08-25T22:52:48+5:30
गणेशोत्सव तोंडावर : काळ्या बाजाराने धान्यखरेदीची वेळ

रत्नागिरी एपीएलधारक धान्यापासून वंंचित
रत्नागिरी : गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अजूनही एपीएल शिधापत्रिकाधारकांचे आॅगस्ट महिन्याचे धान्य आले नसल्याने त्यांना या सणासाठी काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील एपीएलधारकांची संख्या ९८,१९३ इतकी आहे. त्यांच्यासाठी दर महिन्याला ५६४ मेट्रिक टन गव्हाची आणि ४६१ मेट्रिक टन तांदळाची मागणी असते.
केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, एपीएलधारकांना अनियमित धान्यपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेला प्रारंभ झाल्यानंतर एपीएलधारकांना तीन महिने धान्याची प्रतीक्षा करावी लागली होती. त्यानंतरही जुलै महिन्यापर्यंत धान्यपुरवठा करण्यात आला.
मात्र, आता आॅगस्टच्या शेवटी गणेशोत्सवाला प्रारंभ होेत आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटाला सप्टेंबरपर्यंतचा धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे.
एपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी अजूनही आॅगस्ट महिन्याचे नियतन मंत्रालयातच मंजूर होऊन आलेले नाही. गणेशोत्सवाला केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सण कसा साजरा करणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत धान्यच उपलब्ध झाले नसल्याने एपीएलधारकांना काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.
ऐन गणेशोत्सवात अन्नधान्याच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रास्त दराच्या दुकानाचा मोठा आधार ठरत होता. मात्र धान्यच न आल्याने या कार्डधारकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता उर्वरित एकदोन दिवसात तरी धान्य पदरात पडणार का? असा सवाल कार्डधारकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)े