रत्नागिरी : युतीच्या भांडणात आघाडीचा लाभ !

By Admin | Updated: September 23, 2014 23:53 IST2014-09-23T22:06:27+5:302014-09-23T23:53:14+5:30

निवडणुकीचा ज्वर : कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चितता, चलबिचल वाढली

Ratnagiri: Advantage of the alliance with the alliance! | रत्नागिरी : युतीच्या भांडणात आघाडीचा लाभ !

रत्नागिरी : युतीच्या भांडणात आघाडीचा लाभ !

रत्नागिरी : राज्यभरात युती तुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चितता आहेच, त्याशिवाय चलबिचलही वाढली आहे. युती करावी, असे दोन्ही पक्षांना वाटत असताना मागे येण्यास कुणीच तयार नसल्याने वाढलेला हा युतीचा घोळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे. युतीची घोडदौड थांबताना आघाडीचा चंचूप्रवेशही यामुळे होणे शक्य होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यामुळे अनेक बदलाचीही शक्यता आहे.
राज्यात युती आणि आघाडीमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. मात्र, युतीमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे कार्यकर्तेही इरेला पेटले आहेत. दोन्हीही पक्ष जागावाटपावरून स्वत:च्या भूमिकेवर अडून बसल्याने हा प्रश्न चिघळला आहे.
युती तुटल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र येऊन रत्नागिरीच्या राजकारणात मोठी भरारी मारता येणे शक्य आहे. शिवसेनेने रत्नागिरीत चंचूप्रवेश केला, त्यावेळेपासून आतापर्यंत मागे वळून पाहिलेले नाही. त्यानंतर युती झाली आणि युतीने एकापाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या युतीची घोडदौड रोखण्यात काही प्रमाणात राष्ट्रवादीला यश आले असले तरी अजूनही ग्रामीण भागात युतीचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. मात्र, युतीची ही दोन मने दुभंगल्यास अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. (प्रतिनिधी)

राजापुरात शिवसेनेवर परिणाम शक्य
राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना भक्कम असून, भाजपचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांदरम्यानची असणारी युती तुटली तरी शिवसेनेवर त्याचा कुठलाच परिणाम होणार नाही. असे सध्याचे चित्र असले तरी युती तुटल्यानंतर त्यामधून मतदारांमध्ये नकारार्थी संदेश जाऊन यशाचे पारडे आघाडीच्या बाजूने झुकू शकते.
गुहागरात पूर्वीचीच पुनरावृत्ती
मागील विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाच्या जागा वाटपावरुन वाद झाला. युती असूनही रामदास कदम व डॉ. विनय नातू एकमेकांसमोर लढल्याने युतीच्या मतांचे विभाजन झाले. यावेळी युती तुटल्यास पुन्हा तीच पुनरावृत्ती होईल, अशी स्पष्ट राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.
दापोलीत सेनेला महागात पडेल!
दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची गेली २५ वर्षे निर्विवाद सत्ता आहे. शिवेनेचे आमदार सूर्यकांत दळवी युतीचे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. परंतु पाच वर्षांपूर्वी भाजपची सूत्र केदार साठे यांच्याकडे आली. त्यामुळे भाजपला चांगले दिवस येऊ लागले. ही बाब सेनेला महाग पडू शकते.
चिपळुणात राष्ट्रवादीसाठी मोकळे रान!
शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य राहिली आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपाने अधिक जागा मागितल्यामुळे ही युती अडचणीत आली आहे. युती तुटल्यास चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात शिवसेना व भाजपाचे दोन्ही उमेदवार वाऱ्यावर पडतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळेल हे मात्र निश्चित.
रत्नागिरीत सेनेच्या पथ्यावर!
फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या महायुतीमुळे सेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्यास तो निर्णय सर्वाधिक सेनेच्या पथ्यावर पडेल, अशी स्थिती रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार सेनेचे ‘मावळे’ कामालाही लागले आहेत.

भाजपकडे दुर्लक्ष नको...!
चिपळूण : शिवसेना - भाजप युती झाल्यास सदानंद चव्हाण यांचे पारडे जड राहील. त्यांच्यासमोर शेखर निकम यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. शिवाय देवरुखमध्ये आमदार चव्हाण व जिल्हाप्रमुख राजू महाडिक असे दोन गट सक्रिय आहेत. जिल्हाप्रमुखांचा गट आमदार चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास काम करण्यास अनुकूल नाही, याचा फटका युती तुटल्यास अधिक बसेल. या मतदार संघात चिपळूणमध्ये भाजपाची फारशी ताकद नाही. तरी मतदारसंघात ८ ते १० हजार मते भाजपाची आहेत. संगमेश्वरमध्येही भाजपची १२ ते १५ हजार मते आहेत. ही मते निर्णायक आहेत. युती तुटल्यास सेनेच्या मताधिक्यातून ती घटतील. देवरुख नगरपंचायतीत भाजपाचे ७ नगरसेवक आहेत. धामापूर जिल्हा परिषद गट भाजपाकडे आहे. चिपळूण तालुक्यातील भागात भाजपाचा एकही पदाधिकारी नाही. युती तुटली तर भाजपच्या उमेदवाराला गवळी समाजाची मते मिळून शिवसेनेच्या मतात अधिक घट होईल. शिवाय जिल्हाप्रमुखांचा गट आमदारांच्या विरुद्ध गेला, तर राष्ट्रवादीचे शेखर निकम सहज निवडून येतील. येथे काँग्रेसने निकम यांना साथ केली नाही तरी काँग्रेसची ८ ते १० हजार मते काँग्रेसचा उमेदवार घेईल, त्याचा फारसा परिणाम राष्ट्रवादीच्या उमेदवारावर होणार नाही.(प्रतिनिधी)
...तर राष्ट्रवादी-सेनेतच खरी लढत
रत्नागिरी : युती तुटल्यास रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत रंगणार आहे. कारण या मतदारसंघात भाजपची ताकद त्यामानाने खूपच कमी आहे.
रत्नागिरीत भक्कम असलेल्या शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख बंड्या तथा प्रदीप साळवी, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उदय बने यांची नावे सध्या आमदारकीसाठी जोरदार चर्चेत आहेत. २००४ व २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीच्या जागेवर राष्ट्रवादीेचे उदय सामंत यांनी विजय मिळविला. पंचायत समितीवर सेनेचा झेंडा, ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असे असतानाही विधानसभा जागेवर मात्र राष्ट्रवादीचा दोनवेळा विजय झाला. यामागे नेमके गुपित काय, याची चर्चा गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. सेनेतीलच एक प्रवाह भाजपाला साथ देण्याऐवजी फितूर झाल्याने त्याचा लाभ राष्ट्रवादीला झाला, अशी खुलेआम चर्चा सेनेतच सुरू होती. भाजपाने त्याबाबत तक्रारही केली होती. परंतु त्याबाबत सेनेच्या नेत्यांनीही त्यावेळी फारशी दखल घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत सेनेतर्फे विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आणि हा प्रवाह मोडून काढत त्यांनी विजय मिळवला. याचा फायदा भाजपच्या बाळ माने यांना होईल, असा विश्वास भाजपाला आहे. मात्र, महायुती तुटल्यास सेनेची स्थिती भक्कम असल्याने सेना-राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे.(प्रतिनिधी)
भाजपला अपुरा कालावधी
दापोली : दापोलीत शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपने ताकद वाढवली आहे. मात्र आयत्यावेळी युती मोडली तर भाजपसाठी प्रचाराला कालावधी खूपच कमी मिळणार आहे. त्यामुळे सेनेची ताकद फार कमी होईल, असे आजच्याघडीचे तरी चित्र नाही.
दापोली विधानसभेत भाजपची ३० हजार मते आहेत. ही मते केवळ भाजपची आहेत. नाराजांची मदत झाल्यास भाजपला अधिक बळ मिळू शकेल. दुसरीकडे शिवसेनेत अंतर्गत वाद सुरु आहे. विद्यमान आमदारांना तिकीट नको म्हणून पक्षातीलच काही लोकांनी सह्यांची मोहीम राबवल्याची चर्चा आहे. तसेच रामदास कदम यांनी दापोली विधानसभेवर दावा केल्याने विधानसभा निवडणुकीत कदम विरुद्ध दळवी गट तट पडल्यास त्याचा फटका सेनेला बसू शकतो. या मतदारसंघात कुणबी समाजातर्फे अपक्ष उमेदवार उभा राहणार असल्याने या मतदारसंघात समाज फॅक्टर चालणार आहे. हा फॅक्टर चालल्यास त्याचा सर्वाधिक फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे. २५ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पाहता मतदारांना बदल हवा असल्यास भाजपचा नवा तरुण चेहरा म्हणून केदार साठे यांच्याकडे मतदार आकर्षित होऊ शकतात. परंतु शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने भाजपला गावापर्यंत पोहोचण्यास अपुरा अवधी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ratnagiri: Advantage of the alliance with the alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.