रेशनकार्डलाही ‘आधार’ अनिवार्य
By Admin | Updated: November 22, 2014 00:13 IST2014-11-21T22:35:58+5:302014-11-22T00:13:17+5:30
शिरगावात ग्रामस्थांची लगबग : धान्य दुकानदारांकडे कार्ड जमा करा

रेशनकार्डलाही ‘आधार’ अनिवार्य
शिरगांव : कौटुंबिक शिधावाटप पत्रिकांना (रेशनकार्डाला) आता या महिन्याअखेरपर्यंत आधारकार्ड जोडणे शासनाने अनिवार्य केल्याने आधारकार्ड काढण्यासाठी शिरगांव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच लगबग सुरु झाली आहे.
रेशनकार्डधारकांनी यापूर्वी नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी भरलेल्या अर्जांना आता आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेतील संयुक्त बँक खात्याची झेरॉक्स, रेशनकार्डवरील कुटुंब प्रमुखाचा फोटो, कुटुंबप्रमुख जर पुरुष असेल तर त्या रेशनकार्डातील नमूद स्त्री कुटुंब प्रमुखाचा फोटो व तिच्या आधारकार्डची झेरॉक्स येत्या महिन्याअखेर रास्त दराच्या धान्य दुकानदाराकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिरगाव येथील जिल्हा बँकेत यापूर्वी आधारकार्डची नोंदणी करण्याची सुविधा सुरु होती. गेली काही महिने येथील आधारकार्ड नोंदणी करण्याच्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने नोंदणी बंद करण्यात आली होती. शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नवीन मशिनरी बसविण्यात आली असून या मशिनची २२ नोव्हेंबरला चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेत लवकरच आधारकार्डची नोंदणी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक रावजी चिंदरकर यांनी दिली आहे.
जिल्हा बँकेत आधारकार्ड नोंदणी बंद झाल्याने व महिना अखेरपर्यंत रेशनकार्डच्या फॉर्मला आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यास कमी अवधी असल्यामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ सुरु झाल्याचे चित्र आहे.
रेशनकार्ड बरोबरच आता सिलेंडर धारकांनाही आधारकार्ड जोडणे सक्तीचे केले असून गॅस धारकांना आता मोबाईलवरही याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.
शिरगांव दशक्रोशीतील ग्रामस्थांना यापूर्वी आधारकार्ड काढण्यासाठी देवगड किंवा तळेबाजार येथे जावू लागत होते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यानंतर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतही सुविधा सुरु करण्यात आली. वाडीवार ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावात, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात कॅम्प आयोजित करुन येथील ग्रामस्थांची आधारकार्ड काढण्याची सोय करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ही सेवा बंद होती. आता पुन्हा ही सेवा सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)