संगीत रजनीने रसिक मंत्रमुग्ध !
By Admin | Updated: November 16, 2015 23:58 IST2015-11-16T22:58:49+5:302015-11-16T23:58:57+5:30
सुमधुर गीतांचा त्रिवेणी संगम : जानवली नदीकाठावर दीपतरंग कार्यक्रम उत्साहात

संगीत रजनीने रसिक मंत्रमुग्ध !
कणकवली : विद्युत रोषणाईच्या जोडीने सुंदर रांगोळी पाहण्याबरोबरच सुमधुर गीते ऐकण्याचा त्रिवेणी संगम कणकवलीवासीयांना साधता आला. निमित्त होते ते कामत बिल्डर्स व अॅडलिब्ज स्टुडिओच्यावतीने कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपतरंग’ या कार्यक्रमाचे. जानवली नदीवरील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या या संगीत रजनीत कणकवलीवासीय मंत्रमुग्ध झाले.दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कणकवलीवासीयांचा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत असतो. यावर्षीही शनिवारची रात्र या कार्यक्रमाने सुरमय झाली.
प्रीतेश कामत, शशिकांत कांबळी, मितेश चिंदरकर, रविकिरण शिरवलकर, राहुल कदम, प्रीती बावकर, शामल सामंत, राजदुलारी मेस्त्री, अभी मेस्त्री, श्रद्धा पटेल या कलाकारांनी शनिवारची संध्याकाळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने यादगार बनविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या प्रवाही भाषेत सिनेअभिनेते अभय खडपकर यांनी केले. त्यामुळे या कार्यक्रमात आणखीनच रंगत आली.
नेट-सेट परीक्षेत मराठी या विषयात संपूर्ण भारतात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यामंदिरचे शिक्षक कांबळी यांचा सन्मान यावेळी प्रकाश कामत यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)
कणकवलीवासीयांसाठी महापर्वणीच
जानवली नदीपात्रात दिवे सोडून उपस्थित रसिकांनी दीपतरंगाचा एक अनोखा अनुभव यावेळी घेतला. तसेच आकाशकंदीलही यावेळी आकाशात सोडून दिवाळीचा आनंद लुटला. शामल सामंतसह अन्य कलाकारांनी विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. अभी मेस्त्री या गायकाने कैलास खेर या सुप्रसिद्ध गायकाच्या आठवणी ताज्या केल्या. तरुणाईसाठी त्याची गीते उत्साह वाढविणारी ठरली. त्यामुळे दीपतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम एक महापर्वणीच ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.