राणेंची दहशत प्रवृत्ती उघड
By Admin | Updated: July 21, 2014 23:22 IST2014-07-21T23:17:02+5:302014-07-21T23:22:07+5:30
वैभव नाईक : राजकीय भवितव्यासाठी राजीनामा नाट्य

राणेंची दहशत प्रवृत्ती उघड
कणकवली : विरोधकांकडून दहशतीचा बागुलबुवा केला जात असल्याचे पालकमंत्री नारायण राणे सांगत होते. मात्र, दगड उचलणाऱ्यांचे हात तोडण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देणाऱ्या नारायण राणेंनी आपली दहशत माजवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.
वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, रविंद्र फाटक, गौरीशंकर खोत असे डावे-उजवे हात शिवसेनेने घेतले आहेत. त्यामुळे दगड मारणाऱ्यांचे हात तोडणारे त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाहीत. राणेसमर्थक असलेले काही माजी आमदार ‘मातोश्री’ बाहेर घिरट्या घालत आहेत, असे राजन तेली यांचे नाव न घेता नाईक म्हणाले. राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून आता नारायण राणेंकडे आमदारच शिल्लक नाहीत.
इकोसेन्सिटीव्ह झोनखाली १९२ गावे अजूनही आहेत. जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टर जमिन वनसंज्ञेखाली आहे. टाळंबा, नरडवे आदी धरणप्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. सोलापूर-पुणे, नगर-पुणे मार्ग चौपदरीकरण होत आहे. तर नाशिक-मुंबई आठ पदरी होत आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्ग गेली दहा वर्षे चौपदरीकरणापासून रखडला आहे. या बाबींसाठी कधी राणेंनी राजीनामा अस्त्र वापरून दबाव आणला नाही. मात्र, आपल्या राजकीय भवितव्यासाठी ते राजीनाम्याची खेळी करत आहेत. नारायण राणेंवर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते हे त्यांचे विधान चुकीचे आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यावर टीका करून उलट राणे प्रसिद्धी मिळवत आहेत. (प्रतिनिधी)
रविंद्र फाटक लवकरच जिल्हा दौऱ्यावर
शिवसेनेत प्रवेश केलेले ठाण्याचे नगरसेवक रविंद्र फाटक हे पुढील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी फाटक त्यांचे अनेक समर्थक व ‘विरोधक’ शिवसेनेत सामावून घेणार आहेत. फाटक यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत केले जाईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.