राणेंना टिकेचा अधिकार नाही : जठार
By Admin | Updated: July 10, 2014 23:37 IST2014-07-10T23:28:38+5:302014-07-10T23:37:55+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विविध माध्यमातून फसवणूक नारायण राणे यांनी केली

राणेंना टिकेचा अधिकार नाही : जठार
कणकवली : गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विविध माध्यमातून फसवणूक नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे मोदी सरकार जनतेची फसवणूक करीत आहे, असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. सिंधुदुर्गबरोबरच महाराष्ट्राचा कारभारी आगामी निवडणुकीत जनता बदलणार आहे. त्यामुळे कारभारी बदला हा संदेश घेऊन ‘कमल शक्ती सप्ताहा’च्या माध्यमातून जनतेसमोर जाणार असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, जिल्ह्याचा अथवा राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी कारभारी चांगला असावा लागतो. मात्र तसे होताना दिसत नाही. गेल्या २५ वर्षात नारायण राणेंनी काय केले? हे त्यांच्या मुलाला कळले, पण स्वत: राणेंना कळले नाही. त्यामुळे आता जिल्ह्याचा कारभारीच बदलायला हवा.
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हती, असे जर राणे म्हणत असतील तर राणेंविरोधाची लाट इथे होती, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे त्याबाबत नारायण राणेंनी चिंतन करणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांना लोकोपयोगी काम करता आले नाही.
त्याची नाराजी जनतेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. जिल्ह्यातील ग्रामविकास यंत्रणा खिळखिळी झाली असून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पदवीधर पशुवैद्यकीय अधिकारी, कोतवाल, तलाठी अशा अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य शासनाशी असहकार सुरू केला आहे. अंगणवाडी सेविका संपावर जाण्याच्या पवित्र्यात आहेत.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामविकास यंत्रणाच आजारी पडली असून काँग्रेस शासनाच्या नाकर्तेपणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे जनतेसमोर हाच विषय घेऊन कमल सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही जाणार आहोत, असेही आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी बोलताना म्हणाले. (वार्ताहर)