राणेंची मते कायम : विरोधातील वाढली

By Admin | Updated: May 18, 2014 00:30 IST2014-05-18T00:28:04+5:302014-05-18T00:30:01+5:30

मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

Ranee's opinion persisted: Opposition grew | राणेंची मते कायम : विरोधातील वाढली

राणेंची मते कायम : विरोधातील वाढली

 मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मिळालेले २६ हजाराचे मताधिक्य यावेळी गायब झाल्याचे आकडेवारीतून दिसत असले तरीही सहा मतदारसंघापैकी कणकवली विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसच्या उमेदवाराची मतपेटी कायम राहिली आहे. राणेंची मते कायम राहिली मात्र, त्यांच्या विरोधातील मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. २००९ च्या निवडणुकीत नीलेश राणे यांचा ४६ हजार मतांनी विजय झाला होता. त्यात कणकवली विधानसभा क्षेत्राचा तब्बल २६ हजार मतांचा वाटा होता. हे मताधिक्य आताच्या निवडणुकीत गायब झाल्यासारखे दिसत आहे. त्याचवेळी एकूण वाढलेल्या मतदानाचाही विचार करण्याची गरज आहे. हे वाढलेले मतदान राऊत यांच्या पारड्यात गेले आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रात राऊत यांना ७२६४१ तर राणे यांना ७१२६४ एवढी मते मिळाली. म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा पंचवीस हजारांचे मताधिक्य घटले आहे. बालेकिल्ल्यानेच कॉँग्रेसला दणका दिल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. दुसर्‍या बाजूने पाहिल्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातच कॉँग्रेसच्या १३७७ मतांची घट झाली आहे. वास्तविक गेल्या निवडणुकीत नीलेश राणे यांना कणकवली विधानसभा क्षेत्रात ७०००१ मते मिळाली होती. त्यात वाढ होऊन या निवडणुकीत त्यांना ७१२६४ मते मिळाली आहेत. त्यामुळे नीलेश राणे यांना त्यांचे हक्काचे मतदान झालेले आहे. हजारभर मते जास्तच पडली आहेत. मात्र, त्यांच्यासमोर उभे ठाकलेल्या विनायक राऊत यांना वाढलेल्या मतदानाचा फायदा झाला आहे. मागील निवडणुकीत सुरेश प्रभू यांना या क्षेत्रात ४३,९३३ मते होती. यावेळी राऊत यांना ७२६४१ मते पडली. म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा २८,७०८ मते शिवसेनेच्या उमेदवाराला जास्त पडली. जे जास्तीचे मतदान झाले ते सर्व शिवसेनेच्या पारड्यात गेले आहे. वाढलेल्या मतदानाने कॉँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळवल्याचे दिसत आहे. सुरेश प्रभ हे स्वच्छ प्रतिमेचे हुशार व्यक्तिमत्त्व होते. मात्र, त्यांनी २००९च्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात जास्त संपर्क ठेवला नाही. राऊत यांनी यावेळी ही चूक केलेली नाही. त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करत वाडीवस्तीवर जाऊन मतदारांना भेटी दिल्या. त्यावेळी भाजपाने आमदार जठार आणि जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली सुसूत्रपणे प्रचार राबविला. कणकवलीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि आमदार प्रमोद जठार तेवढेच कारणीभूत ठरले आहे. जठार यांनी आपल्या आगामी विधानसभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत उघडलेल्या जोरदार आघाडीने नाराज मतदारांना बाहेर काढण्यासाठी उद्युक्त केले. त्याचवेळी कॉँग्रेसचा गाफीलपणा नडला का याचाही विचार झाला पाहिजे. या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढली. वाढलेल्या मतदानात युवा वर्गाचाही मोठा सहभाग आहे. कॉँग्रेसचा आपला टक्का कायम राहिला. मात्र, नाराज मतदार बाहेर पडला तर काय होईल, याकडे कॉँग्रेसचे दुर्लक्ष झाले. नमो फॅक्टरसह वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मारलेली मुसंडी, आमदार जठार यांनी गेल्या पाच वर्षांत केलेला दबदबा, त्याचबरोबर कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची दंडेलशाही, ठेकेदारीतील एकाधिकारशाहीतून निर्माण झालेला अंतर्गत कलह अशी कारणे या विरोधात वाढलेल्या मतांमागे असू शकतात.

Web Title: Ranee's opinion persisted: Opposition grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.