राणेंना कवडीचेही मोल नाही : भास्कर जाधव
By Admin | Updated: October 21, 2014 00:18 IST2014-10-21T00:16:10+5:302014-10-21T00:18:44+5:30
कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे.

राणेंना कवडीचेही मोल नाही : भास्कर जाधव
गुहागर : सिंधुदुर्गात नारायण राणेंचा झालेला पराभव म्हणजे कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. मीच कोकणचा नेता म्हणवून नारायण राणे यांना कोकणात कवडीचेही मोल नसल्याची टीका विजयानंतर भास्कर जाधव यांनी जाहीर व्यक्त केली.
जाधव म्हणाले की, नीलेश राणे यांनी माझ्या विरोधात अपक्ष उभे राहण्याची घोषणा केली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार ३१० मते मिळाली. प्रत्यक्षात नीलेश राणे माझ्यासमोर उभे असते, तर ३५० मतेही मिळाली नसती. माझ्या पराभवासाठी काँग्रेसची मते भाजपकडे फिरवण्याचा कुटील डावही खेळण्यात आला. माझ्या विरोधात पक्षांतर्गत अनेक फुटीरही होते. २०० कोटींची कामे झालीच नाहीत, असे भासवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न झाला. पक्षांतर्गत अनेकवेळा सहकाऱ्यांनीच माझ्या विरोधात तक्रारी केल्या. तरीही वेळोवेळी शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आज ही स्थिती पाहता शिवसेना - भाजपची मते एकत्रित करुनही माझी मते जास्त होत आहेत. निवडणुकीपूर्वी येणाऱ्यांपैकी गीते व नातूंचा समावेश आहे. पण, जनता सतर्क आहे. केलेल्या विकासकामाला मतदान झाले, कोणीही कल्पना केली नव्हती. पण मी निवडणुकीपूर्वीच ७५ ते ८० हजार मते घेईन, असे जाहीर केले होते. याला यश आल्याचे जाधव म्हणाले. या निवडणुकीत माझे विरोधक राणे मात्र भुईसपाट झाल्याचेही जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)