राणेंची कोंडी दु:खदायक : भाई गोवेकर
By Admin | Updated: July 25, 2014 22:51 IST2014-07-25T22:31:41+5:302014-07-25T22:51:41+5:30
राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलेले अनेक समर्थक आता शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांचे शिवसेनेत स्वागतच केले जाईल,

राणेंची कोंडी दु:खदायक : भाई गोवेकर
मालवण : सन २००५ मध्ये नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. शिवसेनेत असेपर्यंत त्यांना प्रतिष्ठा होती. त्यांची शिवसेनेतील राजकीय कारकिर्दही सन्मानाची होती. मात्र शिवसेनेचा त्याग करून राणे काँग्रेसवासी झाल्यानंतर त्यांची होत असलेली राजकीय कोंडी पाहता दु:ख होत असल्याची टीका शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी केली. राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलेले अनेक समर्थक आता शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांचे शिवसेनेत स्वागतच केले जाईल, असेही गोवेकर म्हणाले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी शुक्रवारी मालवण शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख जाबीर खान, सन्मेश परब, चंदू खोबरेकर, महेश शिरपुटे आदी उपस्थित होते.
भाई गोवेकर म्हणाले, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची त्यांच्याच पक्षाने कोंडी केली आहे. आज ते शिवसेनेत असते तर त्यांची राजकीय कारकीर्द चढती राहिली असती. मुळात काँग्रेस पक्षात राणेंचीच घुसमट होत असल्याने अनेक राणे समर्थक आता शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत. माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या अभियानादरम्यान अनेक राणे समर्थकांनी आपण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेत येणार असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येक समर्थकांचे शिवसेनेत स्वागतच केले जाईल, असे गोवेकर
म्हणाले. (प्रतिनिधी)
परूळेकरांना शिवसेना लवकरच समजेल
काँग्रेसचे प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर देताना गोवेकर म्हणाले, परूळेकरांनी या जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांची माफी मागावी. त्यांना शिवसेनेचा पूर्वइतिहास माहीत नाही. त्यांनी तो अगोदर जाणून घ्यावा. शिवसेना ही काय चीज आहे हे त्यांना लवकरच समजेल. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी केलेले आंदोलन कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हते. महाराष्ट्र सदनात मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन केले होते. परूळेकरांनी याबाबत फुकटची बडबड करू नये.