सरकारचे ‘बुरे दिन’ आणणार : राणे

By Admin | Updated: July 10, 2015 01:09 IST2015-07-10T01:08:30+5:302015-07-10T01:09:08+5:30

काँग्रेसचा भव्य मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, हजारोंची उपस्थिती

Rane will bring 'bad days' of the government | सरकारचे ‘बुरे दिन’ आणणार : राणे

सरकारचे ‘बुरे दिन’ आणणार : राणे

सिंधुदुर्गनगरी : पंधरा दिवस उपाशी ठेवून बिर्याणी समोर ठेवल्यावर तुटून पडावे, तसे सगळे मंत्री सत्तेवर तुटून पडले आहेत. ‘एमआयडीसी’च्या पैशांवर मुख्यमंत्र्यांची परदेशात ऐश चालू आहे. जिल्ह्याचा विकास होऊ नये म्हणून भाजपचे मंत्री केंद्रात बसून कटकारस्थान करतात. त्यात गोव्यातील मंत्र्यांचा हात आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या या सरकारचे ‘बुरे दिन’ आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे सरकार पाडण्यासाठी सज्ज असून राज्यभर दौरा करणार आहे, असा एल्गार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे गुरुवारी काँग्रेसच्या मोर्च्याला संबोधित करताना केला.
राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूकबळी, मंत्र्यांच्या खोट्या पदव्या, कोकणातील ठप्प झालेली विकासकामे, भ्रष्टाचार व गगनाला भिडलेली महागाई या विरोधात गुरुवारी काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेच्या युती सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी भवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मधुसुदन बांदिवडेकर, जिल्हा परिषद विषय समिती सभापती अंकुश जाधव, स्नेहलता चोरगे, संजय बोंबडी, गुरुनाथ पेडणेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, प्रमोद कामत, नासीर काझी, एकनाथ नाडकर्णी, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेतकरी, महिलावर्ग उपस्थित होता.यावेळी राणे म्हणाले, मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर सिंधुदुर्गची ओळख निर्माण झाली होती. सर्वच क्षेत्रांत सिंधुदुर्ग आघाडीवर होता. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांत जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याला सर्वस्वी युती सरकार जबाबदार आहे. जिल्ह्यासाठी सी-वर्ल्ड आणला. मात्र, मालवणी माणसांनी त्या ‘सी’चा वेगळाच अर्थ घेतला.
त्याचप्रमाणे चिपी विमानतळ, रेडी बंदर, चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प ही सर्व विकासकामे निधीअभावी ठप्प आहेत. मी केलेल्या कामांचे उद्घाटन करून पालकमंत्री श्रेय लाटत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील होऊ घातलेले प्रकल्प पूर्ण करावेत, अन्यथा त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी नारायण राणे यांनी दिला. (प्रतिनिधी

वेळ येताच सर्व प्रकरणे बाहेर काढू
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र म्हणणाऱ्यांची आज अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. महिला व बालविकास विभागाकडून झालेला भ्रष्टाचार, शिक्षण खात्यात होणारा भ्रष्टाचार अशाप्रकारे आता मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर पडू लागले आहेत. काँग्रेसला नौटंकी म्हणणाऱ्या काळसेकरांनी हे लक्षात घ्यावे की, स्मृती इराणी, विनोद तावडे यासारख्या नेत्यांची बोगस पदवी, ललित मोदींशी संबंधित असलेले भाजपचे मंत्री याला नौटंकी म्हणत नाहीत का? असे सांगत काळसेकर यांचा खरपूस समाचार घेतला. वेळ येताच पुराव्यानिशी सर्व प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराही दिला.


अधोगती थांबविण्यास काँग्रेस कटिबद्ध
जिल्ह्याचा विकास युती सरकाने खुंटून टाकला आहे. यापुढे जिल्ह्याच्या विकासावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. जिल्ह्याची अधोगती थांबविण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.


दुपारी साडेबाराच्या सुमारास ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथून मोेर्चा निघाला. हजारोंच्या उपस्थितीत युती सरकारच्या विरोधात विविध घोषणा देत सारी सिंधुदुर्गनगरी दुमदुमून सोडत मोर्चा अखेर जिल्हाधिकारी भवनासमोर दाखल झाला. त्यानंतर काँग्रेस नेते यांनी युती सरकारवर हल्लाबोल केला.
)

Web Title: Rane will bring 'bad days' of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.