निधी खर्च करण्यात राणे आघाडीवर, जठार पिछाडीवर

By Admin | Updated: July 25, 2014 22:52 IST2014-07-25T22:34:47+5:302014-07-25T22:52:30+5:30

राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर निधी खर्च करण्यात दुसऱ्या क्रमांकावर

Rane leads the back of the fund, behind the jathar | निधी खर्च करण्यात राणे आघाडीवर, जठार पिछाडीवर

निधी खर्च करण्यात राणे आघाडीवर, जठार पिछाडीवर

सिंधुदुर्गनगरी : विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांना एका वर्षात दोन कोटी रूपयांचा निधी स्थानिक विकास कार्यक्रमातून आमदार निधी म्हणून शासनाकडून दिला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत तीन आमदारांचे मिळून ६ कोटी रूपये मिळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या २०१३-१४ या आर्थिक वर्षात पालकमंत्री नारायण राणे हे हा निधी खर्च करण्यात आघाडीवर असून भाजपचे आमदार प्रमोद जठार सर्वात पिछाडीवर राहिले आहेत. सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर निधी खर्च करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
पालकमंत्री नारायण राणे हे कुडाळ-मालवण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २ कोटी २४ लाख रूपये खर्चाची ६० कामे सुचवली होती. या कामांना मंजुरी देऊन नियोजन विभागाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी वर्ग केला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे १ कोटी १९ लाख, सार्वजनिक बांधकाम ६८ लाख, पाणी पुरवठा विभागाकडे ३० लाख, नियोजन विभागाकडे पर्यटनविषयक कामे करण्यासाठी २ लाख आणि मालवण शहरातील विकासकामांसाठी ४ लाख रूपये इतकी तरतूद करण्यात आली होती. १ कोटी ७२ लाखांपैकी १ कोटी ७१ लाख एवढा निधी खर्च झाला आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामांसाठीही सुमारे १ लाख रूपये खर्च होत असल्याचे नियोजन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे राणे आपला जास्तीत जास्त आमदार निधी खर्च करण्यात यशस्वी ठरले आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या आपल्या मतदारसंघातून तीन तालुक्यांमध्ये ९० कामे सुचवली होती. या ९० कामांसाठी २ कोटी २ लाख रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १ कोटी ४१ लाख रूपये निधी संबंधित खात्यांकडे जमा करण्यात आला होता. यातील १ कोटी २० लाखाचा निधी खर्च झाला आहे. यातून ६५ कामे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सुचविलेली २२ कामे प्रगतीपथावर असून त्यावर ३० लाख रुपये खर्च झाला आहे. अजूनही ५० लाख रुपये खर्च व्हायचा आहे.
आमदार प्रमोद जठार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीचा खर्च मात्र फारसा समाधानकारक दिसत नाही. त्यांनी २ कोटी ३१ लाख रुपयांची ८० कामे सुचवली होती. १ कोटी ५४ लाख रुपये संबंधित विभागांना वर्ग करण्यात आले होते. त्यातील ३१ मार्चपर्यंत ३५ लाख ४९ हजार इतकाच खर्च झाला आहे. यातून ४२ कामे पूर्ण झाली आहेत. प्रगतीपथावर २२ कामे असून त्यावर ५३ हजार रूपये खर्च झालेले दाखविण्यात आले आहेत. म्हणजेच जठार यांचा गेल्या आर्थिक वर्षातील तब्बल १ कोटी ७५ लाख रूपये इतका खर्च व्हायचा आहे.
जठार हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून या मतदारसंघात कणकवली, वैभववाडी, देवगड हे तालुके येतात. या तालुक्यांमधील विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम ९७ लाख, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे १४ लाख, पाणीपुरवठा विभागाकडे ५ लाख, माध्यमिक शिक्षणाधिकारी विभागाकडे २१ लाख आणि नियोजन विभागाकडे ८ लाखाचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
सर्वच विभागांवर खर्च
आमदार दीपक केसरकर यांनी २ कोटी २ लाखांची कामे सुचवली असून त्यामध्ये पाणीपुरवठा विभागावर २९ लाख, कृषी विभागावर २ लाख, पर्यटन विकासावर १३ लाख, क्रीडा विभागावर ४ लाख, शासकीय रूग्णालयामध्ये २१ लाख, शिक्षण विभागावर ४९ लाख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांवर १ कोटी २६ लाख इतका निधी तरतूद करण्यात आला होता. केसरकर यांचा निधी सर्वच विभागावर खर्च केल्याचे दिसते. (प्रतिनिधी)

Web Title: Rane leads the back of the fund, behind the jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.