राणे, जठार आज उमेदवारी अर्ज भरणार
By Admin | Updated: September 25, 2014 23:45 IST2014-09-25T21:59:35+5:302014-09-25T23:45:49+5:30
उद्योगमंत्री नारायण राणे, त्यांचे नीतेश राणे कणकवली मतदारसंघातील आमदार प्रमोद जठार, कुडाळमधून वैभव नाईक -शिवराज्य पक्षातर्फे डॉ. तुळशीराम रावराणे -काही अपक्ष

राणे, जठार आज उमेदवारी अर्ज भरणार
सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे, त्यांचे सुपूत्र नीतेश राणे यांच्यासह कणकवली मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रमोद जठार, कुडाळमधून राणेंचे प्रतिस्पर्धी वैभव नाईक यांच्यासह शिवराज्य पक्षातर्फे डॉ. तुळशीराम रावराणे यांच्यासह काही अपक्ष उद्या, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्ह्यात आज, गुरुवारी तीन मतदारसंघांपैकी कणकवली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय श्रीधर सावंत आणि सावंतवाडी मतदारसंघातून हिंदू महासभा पक्षाच्यावतीने एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात आजपर्र्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले आहेत.
सावंतवाडी येथून आज सायंकाळपर्यंत दिवसभरात १३ जणांनी २१ अर्जांची खरेदी केली असून, हिंदू महासभेच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील अजिंक्य धोंडू गावडे यांनी नामनिर्देशन अर्ज प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.
सावंतवाडी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात २१ अर्जांची विक्री झाली. यामध्ये शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, पल्लवी केसरकर, प्रकाश परब, राजेंद्र पोकळे, काँग्रेसतर्फे चंद्रकांत गावडे,
भाजपतर्फे अतुल काळसेकर, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी, सुचिता दळवी, तसेच अपक्ष म्हणून शिवराम दळवी, रेमी आल्मेडा, सिद्धांत परब, महेंद्र सांगेलकर यांनी, तर बसपातर्फे वासुदेव जाधव यांनी अर्जाची खरेदी केली आहे. कुडाळ येथून मात्र दिवसभरात एकाही अर्जाची खरेदी झाली नव्हती. सावंतवाडीतून आतापर्यंत एकू ण ४२ अर्जांची खरेदी झाली असून, यात अपक्ष १५, हिंदू महासभेतर्फे तीन, मनसे चार, शिवसेना पाच, काँग्रेस तीन, राष्ट्रवादी सहा, बसपा तीन व भाजपतर्फे तीन अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. कुडाळ मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे उद्या दुपारी एक वाजता नामनिर्देशन दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी दिली, तर शिवसेनेचे वैभव नाईक जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी दिली. यावेळी भव्य रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. कणकवली मतदारसंघात आज वैभववाडी येथील संतोष पांडुरंग सावंत, गंगाराम बाबाजी रासम, सुजित सुधाकर तावडे या अपक्षांनी, तर काँग्रेस आमदार विजय कृष्णाजी सावंत यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतला; तर फोंडाघाट
येथील विजय श्रीधर सावंत यांनी अपक्ष म्हणून येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत कणकवली मतदारसंघातून ३५ अर्ज घेण्यात आले.