राणे प्रशासनावर बरसले
By Admin | Updated: January 9, 2015 00:02 IST2015-01-08T21:37:36+5:302015-01-09T00:02:12+5:30
आरोंदा जेटीला भेट : बंदर कंपनीने अडविलेल्या रस्त्यांची केली पाहणी

राणे प्रशासनावर बरसले
सावंतवाडी : ज्या रस्त्याला शासनाचा निधी खर्च पडला, तो रस्ता अडवण्यात कसा आला? कुणाचे वीज, पाणी, गटार अडविले तर गुन्हा दाखल केला जातो. एवढी मोठी घटना घडूनसुध्दा अद्याप प्रशासन गप्प का, असा सवाल करत काँग्रेस नेते नारायण राणे प्रशासनावर बरसले. बांधकाम खात्याचे अभियंता प्रकाश शिंदे व पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांच्यावर त्यांनी भडिमार केला. नारायण राणे यांनी संघर्ष समितीची बैठक संपल्यानंतर आरोंदा जेटीला भेट दिली व त्यांनी बंदर कंपनीने अडविलेल्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी आमदार नीतेश राणे, सभापती प्रमोद सावंत, सुदन बांदिवडेकर, अविनाश शिरोडकर, दिनकर तानावडे उपस्थित होते. राणे यांनी संपूर्ण जेटीची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांच्या समोर विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी बांधकाम अभियंता प्रकाश शिंदे यांनी रस्त्याचा नकाशा राणे यांच्यासमोर ठेवला आणि त्यांना रस्त्याबाबत माहिती दिली. मात्र, राणे यांनी शासनाचा रस्ता खासगी व्यक्ती कशी अडवू शकते, मेरी टाईम बोर्ड कुणाचे, त्यांना अधिकार काय, असा सवाल करीत, एखाद्या व्यक्तीने रस्ता, पाणी, गटार अडविले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, मग आता का केला नाही? असा प्रश्न पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांना विचारला. (प्रतिनिधी)
शासनाचा रस्ता खासगी व्यक्ती कशी काय अडवू शकते? मी या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून तेव्हा तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील.
नारायण राणे,
माजी मुख्यमंत्री.
जखमी तारी यांची राणेंकडून चौकशी
काँगे्रेस नेते नारायण राणे यांनी लाठीमारमध्ये जखमी झालेल्या विश्वनाथ तारी यांची चौकशी केली.
तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत लेखी अर्ज द्या. योग्य ती कारवाई केली जाईल, असे तारी यांना सांगितले.