राणे कुटुंबाने २५ वर्षांचे प्रगतीपुस्तक जाहीर करावे : अतुल काळसेकर
By Admin | Updated: September 5, 2014 23:26 IST2014-09-05T22:06:52+5:302014-09-05T23:26:27+5:30
उद्योगमंत्री नारायण राणे शासनाची डेअरीही वाचवू शकले नाहीत. उलट जठारांनी सुरू केलेला डेअरी प्रकल्प बंद पाडण्यासाठी हीन पातळीचे प्रयत्न केले

राणे कुटुंबाने २५ वर्षांचे प्रगतीपुस्तक जाहीर करावे : अतुल काळसेकर
कणकवली : गेल्या २५ वर्षांत राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यात पेट्रोलपंप, जागा, बागा, हॉटेल व्यतिरीक्त कोणता विकास केला याचे प्रगतीपुस्तक जाहीर करावे आणि मगच जठारांवर टीका करावी, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे. येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे उपस्थित होत्या. नीतेश राणे यांनी आमदार जठार यांच्यावर टीका केली होती. काळसेकर म्हणाले की, उद्योगमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रगतीपुस्तक आधी नीतेश राणे यांनी जाहीर करावे. उद्योगमंत्री नारायण राणे शासनाची डेअरीही वाचवू शकले नाहीत. उलट जठारांनी सुरू केलेला डेअरी प्रकल्प बंद पाडण्यासाठी हीन पातळीचे प्रयत्न केले गेले.
कॉँग्रेसच्याच आमदार विजय सावंत यांच्या होऊ घातलेल्या साखर कारखान्याला टोकाचा विरोध नारायण राणे यांच्याकडून झाला. त्यांना जठारांच्या डेअरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उद्योगमंत्री असूनही मतदारसंघातील एमआयडीसी प्रकल्पाला राणे ऊर्जितावस्था आणू शकले नाहीत. सावंतवाडी येथील मिनी एमआयडीसीत किमान सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत. एमआयडीसीचे विश्रामगृह बांधून उद्योगांना ऊर्जितावस्था येणार नाही. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंकडून राज्यातील नको किमान आपल्या मतदारसंघातील उद्योगांना बळ मिळेल अशी आशा होती.
नीतेश राणे यांनी नोकरी एक्स्प्रेसचा भुलभुलैया निवडणुकीच्या तोंडावर आणला. या एक्स्प्रेसच्या जाळ्यात फसून अनेक तरूण-तरूणींना वैफल्य आले आहे. मराठी तरूणांनी उद्योग उभारावेत असे सांगणाऱ्या नीतेश यांनी या एक्स्प्रेसच्या माध्यमातून युवा वर्गाला जिल्ह्याबाहेर सात-आठ हजारांच्या नोकरीला पाठवले. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी पगाराचा बराचसा भाग राहणीमानासाठी खर्च होतो. या एक्स्प्रेसचा फज्जा कसा उडाला हे आम्ही पुराव्यानिशी जाहीर करणार आहोत.
गत लोकसभा निवडणुकीत आम्ही विकास केला असा टेंभा मिरवणाऱ्या कॉँग्रेसची काय अवस्था झाली आहे यावरून येथील तथाकथित नेत्यांनी बोध घ्यावा, असे काळसेकर म्हणाले. (प्रतिनिधी)