संधी देऊनही राणेंनी विकास केला नाहीप्रमोद जठार :
By Admin | Updated: August 17, 2014 22:33 IST2014-08-17T21:54:34+5:302014-08-17T22:33:53+5:30
शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मेळाव्यात टीका

संधी देऊनही राणेंनी विकास केला नाहीप्रमोद जठार :
शिरगांव : जनतेने २५ वर्षे संधी देऊनही पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही. आता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या, अशी टीका आमदार प्रमोद जठार यांनी शिरगांव येथील मेळाव्यात केली.
शिरगांव आंबेखोल येथे शिरगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा १६ आॅगस्ट रोजी झाला.
यावेळी आमदार जठार बोलत होते. ते म्हणाले, कचऱ्याचे साम्राज्य सर्वांनी पाहिले, मात्र साम्राज्याचा झालेला कचरा जिल्हावासियांनी पाहिला आहे. नारायण राणेंवर जनतेने प्रेम केले. २०-२५ वर्षे संधी दिली. विविध मंत्रीपदे, खासदारकी मिळाली, पण विकास करू शकले नाहीत. विकासात ते नापास झालेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत भगवा फडकणार याची सर्वप्रथम चाहूल नारायण राणेंनाच लागली. याची कबुली त्यांनी आपल्या राजीनामानाट्यात बोलूनही दाखवली, अशी टीका जठार यांनी यावेळी केली.
आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, इकोसेन्सिटिव्ह काँग्रेसने लादली. चिरे म्हणजे बॉक्साईट नव्हे, हे पटवून दिले. सत्तेत असताना अधिस्थगन उठवू न शकलेले पालकमंत्री आता पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगत आहेत. नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री करुन नराचा नारायण केला. लोकसभेतील निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते सर्वांवर टीका करत आहेत.
नेत्याला जनतेचा कळवळा असायला हवा. सत्ता ही रोजी रोटीसाठी नाही. जनतेला सर्व खरं खोट कळते. त्याचेच उत्तर निकालात मिळते, अशीही टीका जठार यांनी यावेळी केली.
शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर, देवगड तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले, उपाध्यक्ष राजेंद्र शेटये, सरचिटणीस संजय बांबुळकर, जिल्हा परिषद गटप्रमुख संतोषकुमार फाटक, माजी तालुका सरचिटणीस मंगेश लोके, राजाराम राणे, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा तावडे, दिगंबर तावडे, अमोल लोके, सयाजी पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)