भाजपामुळेच राणे आंदोलनासाठी रस्त्यावर
By Admin | Updated: July 7, 2015 23:16 IST2015-07-07T23:16:11+5:302015-07-07T23:16:11+5:30
अतुल काळसेकर यांचा आरोप : काँग्रेसच्या भाजपाविरोधी आंदोलनावर केली टीका

भाजपामुळेच राणे आंदोलनासाठी रस्त्यावर
कणकवली : काँग्रेस शासनाने जनतेला दिलेली आश्वासने भाजपाचे शासन पूर्ण करीत आहे. गेल्या २५ वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते अवघ्या सहा महिन्यात भाजपा शासनाने करावे अशी अपेक्षा कशी करण्यात येते? असा प्रश्न उपस्थित करतानाच जनतेने नारायण राणे यांना दिलेली संधी त्यांनी गमावली असून भाजपामुळेच त्यांना आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली. येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर उपस्थित होते. अतुल काळसेकर म्हणाले, ९ जुलै रोजी भाजपा शासनाच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्तेत येवून भाजपाला अवघे सहा महिनेच झाले आहेत. याउलट या जिल्ह्याचे नेतृत्व २५ वर्षांहून अधिक काळ नारायण राणे करीत होते. त्यामुळे या जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला कोण कारणीभूत आहे हे दिसून येते. कोकणचे भाग्यविधाते म्हणविणारे नारायण राणे जिल्ह्याचा विकास करू शकले का? हे समजण्याइतकी येथील जनता शहाणी आहे. गेल्या २५ वर्षांत त्यांनी कोणाचेही भले केलेले नाही. ते ज्या प्रकल्पाबाबत शासन काही करीत नाही असे म्हणतात त्या सर्व प्रकल्पांची नुसती घोषणाच त्यांच्याच काँग्रेसने केली आहे. जिल्ह्यातील कोणतेही प्रकल्प बंद पडलेले नाहीत अथवा निधीही कमी झालेला नाही. या जिल्ह्याला भरघोस निधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री करीत आहेत. जिल्हा नियोजनचा आराखडा ९० कोटीवरून १२५ कोटींवर आणण्यात आला आहे. चिपी विमानतळाबाबतचा आरोप खोटा असून त्याबाबत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. बदललेल्या स्थितीवरून सी वर्ल्डचा आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी शासन जमीन बळकावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र भूमीधारकांना पाचपट नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. चौपदरीकरणासाठी सर्व्हे पूर्ण झाला असून आॅगस्टमध्ये नोटीफिकेशन काढण्यात येईल. भात खरेदी आमच्यामुळेच झाली असे एकीकडे म्हणायचे आणि शासनाचे कौतुक करायचे तर शेतकऱ्यांसाठी शासन काही करत नाही असा टाहो फोडायचा ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. तीन वर्षे धान्य साठा पुरेल एवढ्या क्षमतेची गोदामे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर विकसित करण्याचा निर्णयही झाला आहे. मनसेचे काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कंटाळून भाजपात आले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे परशुराम उपरकर दुसऱ्या पक्षांच्या संघटनेत लक्ष घालतात तसा मी त्यांच्या संघटनेत लक्ष घालणार नाही, असा टोलाही एका प्रश्नाचे उत्तर देताना काळसेकरांनी लगावला. (वार्ताहर) गेल्या २५ वर्षात शेतकऱ्यांना जेवढी नुकसानभरपाई कधीही मिळाली नव्हती तेवढी नुकसानभरपाई शासन शेतकऱ्यांना देत आहे. १६ कोटींचा निधी नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे शासन येथील विकासासाठी संवेदनशील असून काँग्रेसने आंदोलनाची नौटंकी बंद करावी. - अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष