वैभववाडी नगराध्यक्षपदी रावराणे
By Admin | Updated: November 25, 2015 00:43 IST2015-11-24T23:48:25+5:302015-11-25T00:43:13+5:30
अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा झेंडा : उपनगराध्यक्षपदी संजय चव्हाण

वैभववाडी नगराध्यक्षपदी रावराणे
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र्र रावराणे विराजमान झाले. त्यांनी शिवसेनेचे रोहन रावराणे यांचा एका मताने पराभव केला. तर भाजपच्या सुचित्रा कदम यांना पराभूत करत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चव्हाण उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्याने काँग्रेसने शहरात फटाक्यांची आतषबाजी केली.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रवींद्र रावराणे यांच्या विरोधात शिवसेनेचे रोहन रावराणे उमेदवार असल्याने निवडीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना स्वतंत्र आणि एकत्र बसवावे अशी लेखी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली होती. तहसीलदार कार्यालयात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत काँग्रेसचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे काही मोजकेच पदाधिकारी येरझाऱ्या घालताना दिसत होते. (प्रतिनिधी)
युतीचा चमत्काराचा दावा ठरला फोल
दुपारी बारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी सर्व नगरसेवकांची सभा घेतली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. आर. गावीत उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेतले. नगराध्यक्षपदासाठी रवींद्र्र रावराणे यांना ९ व रोहन रावराणे यांना ८ तर उपनगराध्यक्षपदासाठी संजय चव्हाण ९ व सुचित्रा कदम यांना ८ मते मिळाली. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार एका मताने अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. यामुळे महायुतीचा चमत्कारांचा दावा फोल ठरला. (अधिक वृत्त हॅलो १)