रामाला विसरणारे तुम्हाला काय लक्षात ठेवणार :राणे
By Admin | Updated: October 7, 2014 23:36 IST2014-10-07T23:16:13+5:302014-10-07T23:36:52+5:30
भाजपवर हल्लाबोल : वैभववाडीत काँग्रेसची प्रचारसभe

रामाला विसरणारे तुम्हाला काय लक्षात ठेवणार :राणे
वैभववाडी : प्रभू रामाला विसरणारे भाजपवाले तुम्हाला काय लक्षात ठेवणार? असा प्रश्न करीत महाराष्ट्रावर केंद्रातील मोदी सरकार सूड उगवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी येथे केला. राज्यात भाजप कधीच सत्तेवर येणार नाही, असेही ते म्हणाले.येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाच्या मंडपात काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ आज, मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, दिगंबर पाटील, सभापती वैशाली रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, स्नेहलता चोरगे, भालचंद्र साठे, विकास काटे, बंड्या मांजरेकर, बाळा हरयाण, बाप्पी मांजरेकर, संदीप कदम, मंगेश गुरव आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी जाहिरात करणारे मोदी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणे सोडाच; परंतु चार महिने नियंत्रणातही ठेवू शकले नाहीत. उलट सरकारच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये इजिप्तचा कांदा त्यांनी आणून ठेवलाय आणि त्याचा व्यापारीही गुजरातचा आहे. गेल्या निवडणुकीत जाहिरातींवर खर्च केलेला पैसा कुठला? हा भ्रष्टाचाराचा नव्हे का? आठ दिवस मोदी महाराष्ट्रात फिरत आहेत; परंतु माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. खोट्या जाहिराती दाखवून जनतेला फसवणे भाजपचा पिंड आहे. मोदींएवढा स्वस्त पंतप्रधान जगात कुठेही सापडणार नाही, अशी खिल्ली उडवत मोदी कासार्डेत येतील, माझ्यावर टीका करून जातील; परंतु त्यांच्यासह
भाजपच्या सर्व नेत्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे नंतर मी काय करतो ते बघाच, असा अप्रत्यक्ष इशारा राणेंनी दिला.
भूलथापांना बळी पडू नकाराणेंनी विजय सावंत व अतुल रावराणे यांच्यावरही सडकून टीका केली. अंबरनाथच्या अतुलला कधी कोणी पाहिले आहे का? असा सवाल करीत विजय सावंत हा विक्षिप्त माणूस आहे. कारखाना काढण्याची त्याची क्षमताच नाही. निवडणुकीनंतर येथील सर्व गुंडाळून मुंबईला पळून जाईल. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांना तालुक्यातून एकही मत पडता कामा नये आणि गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले. (प्रतिनिधी)