राजापूरचा युवक अपघातात ठार
By Admin | Updated: December 30, 2016 23:40 IST2016-12-30T23:40:50+5:302016-12-30T23:40:50+5:30
तोरसे येथील घटना : औषधाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

राजापूरचा युवक अपघातात ठार
बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तोरसे गोवा येथे तोरसे पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरील पत्रादेवीनजीक कंटेनर उलटून झालेल्या अपघातामध्ये जितेंद्र दीपक शिंदे (वय २८, रा. हातिवले, ता. राजापूर) हा चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडल्याचे पेडणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत पेडणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यावरून मुंबई येथे औषधाची वाहतूक करण्यासाठी निघालेला कंटेनर (एमएच ०७-५५४४) हा गुरुवारी रात्री तोरसे चेक पोस्ट व पत्रादेवी सर्कलजवळील दुभाजकाला जोरात धडकला. या धडकेमुळे कंटेनर रस्त्यावर उलटला. या अपघातामध्ये चालक जितेंद्र दीपक शिंदे हा जागीच ठार झाला.
या अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे तेथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पेडणे पोलिसांना या अपघाताबद्दल कळविण्यात आले. पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या अपघाताबाबत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा-बांबुळी येथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची पेडणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पराग पारेख करीत आहेत. (प्रतिनिधी)