राजापूर मतदारसंघ : सभाच नसल्याने प्रचार ‘कूलकूल’

By Admin | Updated: October 6, 2014 22:34 IST2014-10-06T21:19:50+5:302014-10-06T22:34:36+5:30

अजूनही राजकीय वातावरण थंडच

Rajapur Constituency: The campaign is 'Coolcool' because there is no meeting | राजापूर मतदारसंघ : सभाच नसल्याने प्रचार ‘कूलकूल’

राजापूर मतदारसंघ : सभाच नसल्याने प्रचार ‘कूलकूल’

राजापूर : निवडणूक प्रचारसभांसाठी लागणारा वेळ व होणारा खर्च लक्षात घेऊन जाहीर प्रचारसभांऐवजी वाडीवस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन प्रचार करण्याचे तंत्र राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघातील उमेदवारांनी अवलंबिले आहे. त्यामुळे अजूनही इथले वातावरण निवडणूकमय झालेले नाही.
सन २००५च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने घेतलेली विराट जाहीर सभा पक्षाला अपयश देणारी ठरली होती. प्रचंड जनमत लक्षात घेऊन त्यावेळी काँग्रेसने बाजी पलटवली होती. त्यानंतर सावध झालेल्या शिवसेनेत त्यानंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा घेण्याचे टाळले होते. त्याऐवजी गावागावात वाडीवस्त्यांवर जाऊन प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष भेटणे व आपला प्रचार करणे यावर भर दिला होता. त्याचा सेनेला चांगलाच फायदा झाला होता. तीच पद्धत या निवडणुकीतदेखील अवलंबली जात आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच सेनेचा प्रचार सुरु आहे. काँग्रेसतर्फे नेते नारायण राणे यांनी राजापुरात पक्ष पदाधिकाऱ्यांचा घेतलेला मेळावा वगळता त्या पक्षाकडून जाहीर प्रचारसभा होणार नाही. भाजप व राष्ट्रवादीकडून मोठ्या सभांबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. प्रत्येक उमेदवार वैयक्तिक पातळीवर प्रचारात गुंतला आहे.
जाहीर प्रचारसभांना लागणारा वेळ व कार्यकर्ते जमवण्यासाठी होणारा खर्च शिवाय निवडणूक आयोगाची असलेली करडी नजर यामुळे जाहीर प्रचारसभा या मतदारसंघात टाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे धडधडणाऱ्या तोफा, एकमेकांवर होणारे आरोप - प्रत्यारोप यांच्या झडणाऱ्या फैरी यांचे या निवडणुकीत दर्शन होणार नाही.
परिणामी चुरस दिसत नसल्याचे चित्र आहे. आता अखेरच्या टप्प्यात प्रचाराची बदललेली दिशा कायम राहाते का, याकडेही सर्वांचे लक्ष कायम आहे. (प्रतिनिधी)

यापूर्वी या मतदारसंघाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शीला दीक्षित, मनोहर जोशी, नितीन गडकरी, प्रा.मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडीस, बॅ.नाथ पै आदींच्या जाहीर प्रचारसभा पाहिल्या आहेत. त्यामुळे यावेळी जर कुणा नेत्याची प्रचारसभा न झाल्यास अनेक वर्षानंतर बड्या नेत्यांशिवाय प्रचार मार्गी लागल्याचे या मतदारसंघात दिसून येईल.

Web Title: Rajapur Constituency: The campaign is 'Coolcool' because there is no meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.