राजन तेलींची राजकीय हद्दपारी निश्चित : राणे
By Admin | Updated: September 15, 2014 23:21 IST2014-09-15T22:57:44+5:302014-09-15T23:21:15+5:30
सावंतवाडीतील आघाडीचा उमेदवार लवकरच जाहीर

राजन तेलींची राजकीय हद्दपारी निश्चित : राणे
सावंतवाडी : कोकणात अपक्ष उमेदवार चालत नाही आणि मतदार त्यांना स्वीकारत नाहीत हा इतिहास आहे, असे सांगत आम्ही आघाडीच्याच उमेदवाराचा प्रचार करू. सावंतवाडीत अपक्ष म्हणून बढाया मारणारे महिन्यानंतर राजकीयदृष्ट्या तडीपार होतील, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावला. राज्यात पंचरगी लढत होईल, असे मला वाटत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज, सोमवारी सावंतवाडीच्या राजवाड्याला भेट देत राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत नीलम राणे, नूतन सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब, वसंत केसरकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी उद्योगमंत्री राणे म्हणाले, काँॅग्रेसची यादी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल. पहिल्या यादीत सिंधुदुर्गमधील नावे असतील का, हे मी आजच सांगू शकत नाही. राज्यात दोन्ही आघाड्यांत वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंचरगी लढत होईल, असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता राणे यांनी स्पष्ट शब्दांत नाही असे सांगितले. आघाडीतील तिढा दोन दिवसांत सुटू शकेल, असे ही त्यांनी सांगितले. मी आता दिल्लीलाच चाललो असून तेथे हा निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला असून, तो राष्ट्रवादीलाच मिळेल आणि उमेदवारी ही निष्ठावंत उमेदवाराला मिळेल, याचे संकेत त्यांनी दिले. मीच या मतदारसंघाचा उमेदवार ठरविणार असून, मला उमेदवार ठरविण्याचे जे अधिकार दिले आहेत. ते राष्ट्रवादीचा मोठेपणा असल्याचेही त्यांनी सांगितले. हा मतदारसंघातच नव्हे, तर पूर्ण कोकणात अपक्ष उमेदवार चालत नाही. हा इतिहास आहे. आमचे कार्यकर्ते अपक्षाला कधीही साथ देणार नाहीत. राजन तेली जरी अपक्ष राहिले, तरी त्यांच्यासोबत काँग्रेसचे दोन टक्केकार्यकर्तेही जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एका महिन्यानंतर हे उमेदवार तडीपार असतील, असा टोला ही त्यांनी यावेळी तेलींना हाणला.
मी प्रचारप्रमुख असल्याने संपूर्ण राज्यात फिरणार असून, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली येथे प्रचार सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
साळगावकरच उमेदवार
सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे जर आघाडीचे उमेदवार असतील, तर ते मला चालतील. मी त्यांना सर्व ती मदत करेन आणि निवडून आणेन, असे सांगत उद्योगमंत्री राणे यांनी साळगावकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला. तसेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याचेही त्यांनी जाहीर केले.