पावसाचा कहर सुरूच
By Admin | Updated: July 31, 2014 23:29 IST2014-07-31T23:07:30+5:302014-07-31T23:29:59+5:30
जिल्हा पूरसदृश : आपत्ती निवारण कक्ष नावालाच; पुरेशी माहिती नाही

पावसाचा कहर सुरूच
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. काल, बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. जनजीवन विस्कळीत होऊन महामार्गावरील वाहतूकही दोन तास ठप्प झाली होती. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे मात्र या सर्व परिस्थितीबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने हा कक्ष केवळ नावापुरताच असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसाने जवळजवळ सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. महामार्गावर तर पिठढवळ पुलावर सुमारे दोन तास पाणी पुलावरून वाहू लागल्याने त्या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. ही सर्व माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध नव्हती. या घटनेची माहिती गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास दिली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस काढा
पिठढवळ पुलावर पाच फूट पाणी येऊन वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. याबाबत या विभागाला नोटीस काढा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
काल सायंकाळपासून भंगसाळ नदीला पूर आल्यामुळे कुडाळ शहरानजीकच्या आंबेडकरनगरमधील दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे या घरांतील लोकांना स्थलांतर करावे लागले होते. आज, गुरुवारी पूर ओसरल्याने या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
४८ तासांत अतिवृष्टी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे, अशा सूचना प्रशासनप्रमुख ई. रविंद्रन यांनी सर्व विभागांना दिले आहेत.