पावसाचे खबरे
By Admin | Updated: May 29, 2015 23:55 IST2015-05-29T22:27:42+5:302015-05-29T23:55:47+5:30
परंपरा : मान्सूनच्या वर्दीचे संकेत

पावसाचे खबरे
कणकवली : वेधशाळांनी हवामान वर्तवण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षात विकसित झाली. पण, त्याआधी वर्षानुवर्षे ऋतूंमधील बदलाचे संकेत टिपण्याची पद्धत होतीच. ऋतूंमधील बदलाची सर्वात तीव्र जाणीव होते ती पशुपक्ष्यांना आणि झाडांना. त्यांच्याचकडून पावसाच्या आगमनाची खबर मिळते. ग्रामीण भागातील लोकांचा आजही सरकारी वेधशाळेपेक्षा जास्त निसर्गातल्या या खबऱ्यांवर अधिक विश्वास आहे आणि याच संकेतांवर भरवसा ठेवून शेतीच्या कामांचे वेळापत्रक तयार केले जात आहे.खगोलशास्त्राच्या आधारे हवामान खाते तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हवामानातील बदलाचे अंदाज वेळोवेळी वर्तविते. निसर्गातील बदलांची लक्षणे आणि त्यानंतर होणारे परिणाम यांचा गेली अनेक वर्षे अभ्यास केला जात आहे आणि त्यानुसार काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात अजूनही पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पतीमधील बदल पाहून अंदाज बांधला जातो. ऋतूंमधील बदलाचे पडसाद आधीच निसर्गात उमटतात आणि ते संकेत टिपून कामाची उरक केली जाते.
ग्रामीण भागातील या वेधशाळा वर्षानुवर्षे परंपरेतून जपल्या गेल्या आहेत. त्या कोठेही लिखित स्वरूपात नसल्या तरी गेली अनेक वर्षे त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत. निसर्गाची ही भाषा समजून घेण्याची आणि त्याकडे डोळसपणे बघण्याची वृत्ती आजही ग्रामीण भागात जपली जात असल्याने ही भाषा चिरंतन टिकून आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची चाहुल अनेक कारणांनी लागलेली असते. अशावेळी या साऱ्या प्रकारातून शेतकऱ्याला खऱ्या आशेची किरणे दिसायला लागतात. मात्र, हा पाऊस कधी येणार, याची प्रतीक्षा कायमच राहाते. अशा वेळी प्रत्येकजण आपला आदमास व्यक्त करायला लागतो. त्यातूनच कधी अपेक्षाभंग तर कधी समाधान व्यक्त होते. मात्र, बहुतांशी वेळा हे अंदाज अचूकच
ठरतात. (प्रतिनिधी)
सरड्याचे डोके होते लाल
सरड्यासारखे रंग बदलण्याची उपमा माणसं उपरोधाने वापरतात. पण सरड्याच्या रंग बदलण्यामागे काही कारणे असतात. मान्सून जवळ येऊ लागताच, त्या चाहुलीने सरड्याच्या रंगात बदल होतो. एरव्ही पूर्ण तपकिरी रंगाच्या असलेल्या सरड्याचे डोके व शेपटीकडील भाग मान्सून येण्याआधी तांबडा होऊ लागतो. सरड्यांमध्ये होणारा हा बदल शेतकऱ्याला पावसाच्या आगमनाची वार्ता सांगतो.
कावळ्याचे घर खाली
बालपणी काऊ-चिऊच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. गोष्टीत चिऊचे घर मेणाचे, तर कावळ्याचे घर शेणाचे असते. प्रत्यक्षात मात्र कावळा झाडाच्या शेंड्यावर काटक्या किंंवा तारा वापरून घरटं बांधतो. हिवाळा, उन्हाळ्यात कावळा आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर बांधतो. मात्र, पाऊस जवळ आल्याचे संकेत प्राप्त होताच घरटे शेंड्यावरून झाडाच्या मध्यवर्ती फांद्यामध्ये बांधतो.
हुमले उतरतात जमिनीवर
हिवाळ्यात, उन्हाळ्यात झाडांवर सर्रास हुमले (मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या) आढळतात. सणसणीत चावणाऱ्या मुंग्या म्हणून त्यांची खास ओळख आहे. झाडांच्या फांद्यांवर हुमल्यांची घरटी असतात. मात्र, पावसाची चाहुल लागताच झाडावरचे हुमले जमिनीवर उतरतात. जमिनीवर हुमले दिसताच शेतकरी वर्गाला मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळते.
वाळवी बाहेर येणे
कोकणातील भौगोलिक रचनेनुसार लाल मातीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत असतानाच जमिनीला वाळवी धरण्याचे प्रमाण वाढते. शेणाने सारवलेल्या अंगणात हमखास वाळवी दिसून येते. वाळवीतून छोटे छोटे किडे बाहेर पडतात. या किड्यांना पंख फुटतात. रात्रीच्या वेळी दिव्यावर पंखे असलेले किडे आकर्षित होतात. तेही पावसाळा जवळ आल्याचेच संकेत देतात.
बेडकांचे डराऽव डराऽव
बेडकांचे डराव डराव सर्वांना परिचित आहे. तपकिरी रंगाचे बेडूक अचानक रात्रीच्या वेळी जोर जोरात डराव डराव करायला सुरूवात करतात, तेव्हा त्यातून पाऊस आल्याचा संदेश मिळतो. ओढ्यात राहणारे पिवळे बेडूक पाऊस सुरू झाल्यावर बाहेर पडतात. पावसाची चाहुल लागताच ते ओरडू लागतात आणि ते पावसाच्या येण्याचा आनंद व्यक्त करतात, असे ग्रामीण भागात मानले जाते.
डोंगळ्यांची अन्नसाठा मोहीम
घराभोवती किंवा घरात काळे डोंगळे मोठ्या संख्येने येतात. काळे डोंगळे अन्न जमा करीत असतात. निसर्गातील बदलाचा हाही हा एक संकेत आहे. पाऊस जवळ आला की, मानवाप्रमाणे कीटकही अन्न गोळा करून साठा करतात. त्यामुळे काळे डोंगळेदेखील पावसाळ्यापूर्वी जमिनीखालून भरभरून वर येतात आणि अन्नाची साठवणूक करताना दिसतात.
गुलमोहोराच्या फुलांचे झडणे
उष्णतेमुळे अन्य झाडांवरील पाने व फुले झडतात, त्यावेळी एकमेव गुलमोहर मात्र उष्मा वाढत जाईल तसतसा चांगलाच तरारलेला असतो, लाल रंगाच्या फुलांनी बहरलेला असतो. त्यावेळी त्याचे सौंदर्य नक्कीच विलक्षण असते. मात्र, जेव्हा पावसाची चाहूल लागते तेव्हा हळूहळू हा बहर कमी होतो. फुले झडू लागतात. झाडावर एकही फुल शिल्लक राहात नाही, त्यावेळी शेतकरी बांधवांना पाऊस जवळ आल्याचे उमजते.
पाणकोंबड्यांचे कूऽऽकूऽऽकूऽऽकू
निसर्गातील बदलांची पशुपक्ष्यांकडून मिळणारी सूचना रिसीव्ह करणारे टॉवर अजून कुणाला उभे करता आलेले नाहीत. पण ग्रामीण भागात मात्र या सूचना कळण्याची ताकद परंपरेतूनच लोकांकडे आली आहे. त्यातीलच एक घटक म्हणजे पाणकोंबडी. पावसाची चाहूल लागली की, पाणकोंबड्यांची कूऽकूऽकूऽ सुरू होते. दिवसभर जेव्हा हा आवाज ऐकायला येतो, त्यानंतर लवकरच मान्सून येतो.
खेकडे येतात ओढ्यात
निसर्गाचे ऋतूचक्र ठरलेले असते. मात्र, ऋतुचक्रातील बदल हे मानवापेक्षा प्राणीमात्रांना, पक्ष्यांना, झाडांना लवकर कळतात. हवामानात बदल होण्याआधीच ते पुढच्या तयारीला लागतात. पावसाळ्यात शेताच्या बांधावर किंवा ओढ्यात खेकडे सापडत असले तरी पावसाळ्यापूर्वी हेच खेकडे ओढ्याच्या काठावर येतात. काठावर येणाऱ्या खेकड्यांना पाहून पावसाच्या आगमनाबाबत अंदाज लावणे ग्रामीण भागातील लोकांना सोपे होते.
कंदमुळांना कोंब फुटतात
ग्रामीण भागात जवळजवळ प्रत्येकाच्याच परसदारात सुरण नक्कीच असते. घराघरात करंदे, काटेकणंग आणलेले असतात. मात्र, अचानक पाण्याशिवाय करंदे, काटेकणंग किंवा सुरण यांना कोंब येऊ लागतो, त्याला इवली इवली पाने फुटू लागतात. त्यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी पाऊस जवळ आल्याचे सांगतात. ऋतुचक्र बदलण्याआधी निसर्गात होणारे हे बदल सर्वसामान्यांमध्ये निश्चितच कुतूहल निर्माण करतात.
विहिरीचे पाणी खालावते
उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते. विहिरींचे तळ दिसू लागतात. ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करावी लागते. विहिरींचे तळ दिसू लागताच गाळ साफ करण्यात येतो. परंतु विहिरीतील झरे अचानक सुरू होऊन पाणी जमू लागते. ग्रामीण भाषेत त्याला ‘पाणी पाझरणे’ म्हटलं जातं. साफ झालेल्या विहिरींमुळे झरे पाझरल्याचे लोकांना कळतं. आणि त्यामुळे पाऊस अगदीच जवळ आल्याचंही कळतं.
चिंचेच्या झाडाला येते पालवी
चिंचेच्या झाडाला वर्षभर चिंचा लगडलेल्या असतात. परंतु चिंच काढल्यानंतर झाड रिकामे होते. जेव्हा या झाडांना पालवी फुटायला लागते, तेव्हा ऋतू बदल होणार, हा अंदाज लावला जातो. चिंचेचे मोठमोठे वृक्ष छोट्या-छोट्या पानांनी डवरून जातात. जणू काही ही पालवी पहिल्यावहिल्या पावसाच्या स्वागतालाच सज्ज झाल्यासारखी भासते. चिंचेच्या झाडाला फुटलेली ही पालवी शेतकऱ्यांना पावसाळा जवळ आल्याची खबर देते.