पाऊस यंदाही रुसलेलाच!
By Admin | Updated: October 1, 2015 00:34 IST2015-09-30T22:57:13+5:302015-10-01T00:34:53+5:30
रत्नागिरी जिल्हा : पाणीटंचाईचे संकट उभे

पाऊस यंदाही रुसलेलाच!
रत्नागिरी : साधारणत: तीन ऋतू चार महिन्यात विभागण्यात आले आहेत. पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. यावर्षी पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे भविष्यात भीषणटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आतापासूनच पाणी साठवणुकीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जून ते आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात ४ हजार ८४६.५ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, सप्टेंबरअखेर केवळ २००० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना राबवण्यात येत आहे. जलशिवार योजनेंतर्गतही पाणी साठवणुकीसाठी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. वनराई बंधारे, नाला बंधारे, सिमेंट बंधारे आदी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे काम दिवाळीनंतर सुरू होते. प्रशासकीय पातळीवर लोकसहभागातून बंधारे बांधण्यात येतात. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याची गरज आहे.प्रशासकीय पातळीवर याबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे. पाणी जमिनीत मुरले तरच पाण्याचा स्रोत सुधारेल. दरवर्षी मार्च, एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. नाचणी हे दुय्यम पीक घेतले जाते. जिल्ह्यातील शेतकरी दुबार पिकांतर्गत भाजीपाला, पावटा, कुळीथ, तूर, कलिंगडाचे पीक घेत असले तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. यावर्षी कमी पावसामुळे भातपिकाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेणे फायदेशीर ठरेल. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जमिनीचा पोत पाहून भाजीपाला, कडधान्ये व तत्सम् पिके घेणे गरजेचे आहे. मात्र, तसा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फार कमी होताना दिसतो. त्यामुळे शेतकरी नुकसानीत येत आहे.
द्वीदल धान्याचे पीक घेणे गरजेचे
रत्नागिरी जिल्ह्यात तीन हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यावर्षी एक हजार मिलिमीटर इतका पाऊस कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, ओढ्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आणखी काही महिन्यात पाण्याचे स्रोत कमी होऊ नयेत, यासाठी बंधारे बांधकामासाठी तातडीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे ६५ टक्के पाणी वाया जात असल्यामुळे पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. तरच भविष्यात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. भातपीक कापणीस तयार होत आहे. त्यामुळे भाताला पर्यायी दुबार पिके घेण्याची आवश्यकता आहे. वाढत्या महागाईमुळे डाळीचे दर भडकले आहेत. त्यामुळे व्दीदल धान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
-डॉ. श्रीरंग कद्रेकर,
माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ.
पर्जन्यमान कमीच
गेल्या वर्षीही पाऊस कमीच झाला होता. यंदा पावसाचे प्रमाण त्याहून कमी आहे. प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाऊस पडला त्याच्यापेक्षा खूपच कमी यंदा पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहेच, शिवाय यंदा डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने आतापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे. भीषण पाणीटंचाईच्या शक्यतेने नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत.