रेल्वे टर्मिनस प्रश्न सुटणार?
By Admin | Updated: November 16, 2014 00:24 IST2014-11-16T00:19:12+5:302014-11-16T00:24:15+5:30
जनतेच्या अपेक्षा : सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रीपदी निवडीने आशा पल्लवीत

रेल्वे टर्मिनस प्रश्न सुटणार?
नीलेश मोरजकर ल्ल बांदा
सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या सुरेश प्रभु यांचेकडे केंद्रात रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोकण रेल्वेच्या टर्मिनसचा प्रलंबित प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. गेली कित्येक वर्षे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नारायण राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या राजकीय वैमन्यसातून रेल्वे टर्मिनसचा प्रश्न हा वादात राहिलेला आहे. आता सुरेश प्रभूंना केंद्रीय रेल्वेमंत्रीपद मिळाल्याने हा वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाल्याने जनतेच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्याचे तत्कालीन उद्योगमंत्री असलेले नारायण राणे यांनी कोकण रेल्वेचे टर्मिनस हे मडुरा येथे होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आमदार दीपक केसरकर यांनी यांनी मडुरा येथे टर्मिनसला विरोध करीत कोकण रेल्वेचे टर्मिनस हे सावंतवाडी येथे होण्याचा आग्रह धरला होता. गेली कित्येक वर्षे या दोन नेत्यांच्या राजकीय वादात टर्मिनसचा प्रश्न हा प्रलंबित राहिला होता. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून मडुरा स्थानक परिसरातील जमिनींचा टर्मिनसच्या पार्श्वभूमीवर अहवाल मागविण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याने मडुरा येथे टर्मिनस होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर याबाबत कोणतीही हालचाल कोकण रेल्वे प्रशासनाकडून झाली नसल्याने टर्मिनसचा विषय हा रेंगाळत राहिला. कोकण रेल्वे प्रशासनाने मडुरा येथे स्थानकासाठी व रेल्वे ट्रॅकसाठी ५४ हेक्टर जमीन १९९६ साली संपादन केली. मडुरा येथे टर्मिनस करावयाचे झाल्यास कोकण रेल्वे प्रशासनाला अजुन ८ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. मडुरावासीयांचा टर्मिनसला विरोध नाही. मात्र, कोकण रेल्वेने स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या प्रथम सोडवाव्यात, अशी मागणी संघर्ष समितीच्यावतीने सुरेश गावडे यांनी केली आहे. मडुरा येथे रेल्वेचे टर्मिनस झाल्यास मडुरा दशक्रोशीचा कायापालट होणार आहे. यामुळे मडुरा टर्मिनसला स्थानिकांचा पाठिंबाच आहे. सुरेश प्रभुंच्या रुपाने केंद्रीय रेल्वेमंत्री कोकणला मिळाल्याने कोकण रेल्वेच्या टर्मिनसचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. मडुरा येथे जागा उपलब्ध असल्याने टर्मिनससाठी हे सोयीचे ठिकाण आहे.