अपघातात रेल्वे कर्मचारी ठार
By Admin | Updated: November 5, 2015 00:01 IST2015-11-04T22:26:57+5:302015-11-05T00:01:23+5:30
कोकिसरे फाटकाजवळील घटना : संतप्त जमावाकडून गाडीची नासधूस

अपघातात रेल्वे कर्मचारी ठार
वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजीक वळणावर स्कोडा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रेल्वे कर्मचारी विजय गुणाजी टक्के (वय ४०, रा. खांबलवाडी, वैभववाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संतप्त जमावाने अपघातानंतर गाडीची दगड घालून नासधूस केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. यामुळे कोकिसरे, वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
विजय टक्के रेल्वेत नोकरीला होते. त्यांची रेल्वेस्थानक परिसरात नेमणूक होती. सकाळी साडेसात वाजता विजय आपल्या दुचाकी (एमएच ०७ आर ७७३९)ने रेल्वेस्थानकाकडे निघाले होते.
रेल्वे फाटकानजीक वळणावर तळेरेकडून वैभववाडीच्या दिशेने येणाऱ्या स्कोडा कार (एमएच ०४ डीवाय १७०४)ने टक्के यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे ते सुमारे २० फुटांवर झुडपात फेकले गेले आणि दगडावर डोके आपटल्याने बेशुद्ध पडले.
स्कोडा मालक कैजर गोदरेज कोटवाल (रा. मालाड, मुंबई) पत्नीसह गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, वाहतूक पोलीस अनमोल रावराणे, संजय खाडे, के. बी. बागुल, नितीन कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टक्के यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना टक्के यांचा मृत्यू झाला. सांयकाळी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद नव्हता. (प्रतिनिधी)
तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू
रेल्वेत नोकरीला असणारे विजय अष्टपैलू खेळाडू होते. षट्कारांचा बादशहा म्हणून ते सर्वत्र परिचित होते. नोकरी सांभाळून ते क्रिकेट खेळायचे. बऱ्याचदा चौकार, षट्कारांची बरसात करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून द्यायचे. त्यामुळे क्रिकेटरसिक त्यांच्या खेळावर फिदा होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे वैभववाडी तालुका अष्टपैलू खेळाडूला मुकला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.