कोकण मार्गावरील रेल वाहतूक वळविली
By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T22:02:02+5:302014-08-24T22:34:15+5:30
मालगाडी घसरली : सहा एक्स्प्रेस मिरजमार्गे

कोकण मार्गावरील रेल वाहतूक वळविली
मिरज : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मिरजमार्गे वळविण्यात आली आहे. नेत्रावती, दुरांतो, तिरूनेलवेल्ली, कोचीवेल्ली, कोईमतूर आदी लांब पल्ल्याच्या सहा एक्स्प्रेस गाड्या मिरजमार्गे पुणे व बेळगावकडे रवाना झाल्या.
आज सकाळी कोकण रेल्वेमार्गावरील करंजोळी येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या लोंढा, बेळगाव, मिरज, पुणे मार्गे मुंबईकडे रवाना झाल्या. गोव्यातून त्रिवेंद्रम-लोकमान्य टिळक टर्मिनस (१६३४६), कोईमतूर-बिकानेर एक्स्प्रेस (२२४७६), कोचीवेल्ली-बिकानेर एक्स्प्रेस (१६३१२) या मिरजमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्या, तर मुंबईतून लोकमान्य टिळक टर्मिनस-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५), हापा-तिरूनेलवेल्ली एक्स्प्रेस (१९५७८), निजामुद्दीन-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस (१२२८४) या मिरज मार्गे गोव्याला गेल्या.
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मिरजमार्गे वळविण्यात आल्याने एक्स्प्रेस आठ ते दहा तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. मिरज रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेचालकांची व्यवस्था करण्यात आली. (वार्ताहर)