कणकवलीची राडे संस्कृती सावंतवाडीत नको
By Admin | Updated: September 15, 2014 23:29 IST2014-09-15T21:54:15+5:302014-09-15T23:29:13+5:30
दीपक केसरकर यांची टीका : किनळे येथील कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवलीची राडे संस्कृती सावंतवाडीत नको
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्याला बापूसाहेबांचा वारसा आहे. सर्व लोकांना एकत्र ठेवण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. ती किमया टिकविण्याची गरज आहे. यामुळे कणकवलीची राडे संस्कृती या सावंतवाडीत आणू देऊ नका आणि सावंतवाडीत प्रेमाची संस्कृती चालते हे दाखवून द्या, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. किनळे येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, एकनाथ नारोेजी, सावंतवाडी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रुपेश राऊळ, मंगेश तळवणेकर, भाई देऊलकर, किनळे सरपंच यशोदा नाईक, उपसरपंच पांडुरंग नाईक आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. याआधी मी केलेल्या कामांचे नारळ विरोधी नेते मंडळींनी फोडले. गेल्या पाच वर्षात मला मारण्याची धमकी देऊन एकही आमसभा घेऊ दिली नाही. माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, माजी आमदार राजन तेली यांनी हिंमत असेल, तर नारायण राणे यांचा पुत्र ज्या मतदार संघात लढणार आहे, त्या मतदार संघात लढवून दाखवावे. नारायण राणे आणि आपले संबंध बिघडायला राजन तेली हेच जबाबदार आहेत. तसेच मंगेश तळवणेकर हेसुध्दा काँग्रेसमधून बाहेर पडण्यास तेलीच कारणीभूत आहेत. वेळोवेळी राणे यांचे कान भरून काँग्रेसमधून चांगले पदाधिकारी बाहेर काढण्याचे काम तेलींनी केले आहे. त्यामुळेच त्यांची राणेंविरोधात लढण्याची हिंमत होत नसून ते कोणताही संबंध नसताना सावंतवाडी मतदार संघातून लढत आहेत. त्यांना सावंतवाडीची जनता योग्य जागा दाखवेल, असे कांबळी यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)