भाजप-काँग्रेसमध्ये राडा

By Admin | Updated: September 14, 2014 23:57 IST2014-09-14T22:25:31+5:302014-09-14T23:57:21+5:30

दोडामार्ग सभापतीपदी महेश गवस : चार जण ताब्यात

Rada in BJP-Congress | भाजप-काँग्रेसमध्ये राडा

भाजप-काँग्रेसमध्ये राडा

दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवडणुकीवरून रविवारी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यात राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासह चार जणांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून भाजपात गेलेले महेश गवस यांची सभापतीपदी तर उपसभापती म्हणून आनंद रेडकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीवर नाखुष असलेल्या सेनेच्या दोन्ही सदस्यांनी निवडणुकीत अनुपस्थित राहून बहिष्कार टाकला. काँग्रेस- भाजपात झालेल्या राड्यामुळे दोडामार्गात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सेना-भाजप युतीत सारे काही आलबेल नसल्याचे उघड झाले आहे.
सहा सदस्य संख्या असलेल्या दोडामार्ग पंचायत समितीमध्ये केवळ एका सदस्याचे संख्याबळ असलेल्या भाजपाने जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सदस्य फोडत आपले संख्याबळ तीनवर नेले. तसेच काँग्रेसचेच दुसरे सदस्य असलेल्या जनार्दन गोरे यांनादेखील भाजपाने आपल्या गळाला लावल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसच्या हातातून सदस्य निसटल्याने भाजपाचाच सभापती पंचायत समितीवर विराजमान होईल, अशी अटकळ बांधली जात होती. सेनेकडून सुचिता दळवी यांचे नाव सभापतीपदासाठी पुढे केले जात असताना भाजपाने मात्र सेनेला सोबत न घेता स्वतंत्ररित्या सभापतीपदासाठी महेश गवस यांचा, तर उपसभापतीपदासाठी आनंद रेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सेना पदाधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांची आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सुरेश दळवी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र, या बैठकीत सेनेच्या सुचिता दळवी यांना सभापती करण्यावर एकमत न झाल्याने अखेर भाजपाने दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस, भाजपचे कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयाबाहेर गोळा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान प्रत्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाचे महेश गवस, आनंद रेडकर, माजी सभापती सीमा जंगले या पंचायत समिती कार्यालयात जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी गवस यांच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर भाजपा कार्यकर्त्यांनीही परस्पर विरोधी घोषणा सुरू केल्या. या कारणावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होत राडा झाला. लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, रमेश दळवी, विशांत तळवडेकर आदींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यावर घेऊन गेले. तर राजेंद्र म्हापसेकर व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यावर दोन्हीकडील
कार्यकर्ते शांत झाले. दरम्यान, या सभापती निवडीमुळे सेना-भाजपात मात्र तालुक्यात बेबनाव असल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)

सेनेचा निवडणुकीवर बहिष्कार
सेनेकडून सभापतीपदासाठी सुचिता दळवी यांचे नाव सुचविण्यात आले होते. मात्र, दळवी यांना सभापती करण्यावरून भाजपा व सेना पदाधिकाऱ्यांत एकमत झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडीवेळी सेनेचे दोन्ही सदस्य गैरहजर होते. तर काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य जनार्दन गोरे हे देखील अनुपस्थित राहिले. त्यामुळे महेश गवस यांची सभापतीपदासाठी बिनविरोध निवड झाली.

Web Title: Rada in BJP-Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.