गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत जोरदार हाणामारी
By Admin | Updated: December 29, 2014 00:11 IST2014-12-28T23:47:46+5:302014-12-29T00:11:55+5:30
नगराध्यक्षही सहभागी : दोन्ही बाजूंच्या सभासदांनी एकमेकांना चोपले -पोलीस ठाण्यात तक्रार

गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत जोरदार हाणामारी
असगोली : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्याच निवडणुकीत आज, रविवारी जोरदार हाणामारी झाली. त्रुटी असल्यामुळे निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करणारा गट आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणारा गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी संस्थेचे सेक्रेटरी उदय जोशी यांना थोबाडीत मारली. यानंतर हाणामारीस सुरुवात झाली. यावेळी खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. हाणामारीचा प्रकार वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडली.
गुहागर एज्युकेशन सोसायटीची सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीकरिता नवीन नियामक मंडळाची निवडणूक आज आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पद्माकर आरेकर व महेश भोसले यांच्यात निवडणूक होणार होती. सचिवपदासाठी दोन अर्ज, खजिनदार पदासाठी दोन अर्ज, तर संचालकपदासाठी ३३ अर्ज प्राप्त झाले होते. संस्थेत एकूण १३ जणांचे नियामक मंडळ असून, सुदर्म आरेकर हे पदसिद्ध सदस्य आहेत.ही सभा दिलेल्या वेळेत सकाळी १० वाजता सुुरू झाली. सभेचे वातावरण सुरुवातीपासून चांगलेच तापले होते. मागील इतिवृत्त वाचन होऊन त्याला काही दुरुस्त्या सुचवून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकाचे वाचनही काही सूचना देत मंजूर केले.विषय क्रमांक चार हा निवडणूक प्रक्रियेचा असल्याने ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे, असे अध्यक्ष महेश भोसले यांनी जाहीर केले. मात्र, या निवड प्रक्रियेला आपला विरोध असल्याचे संस्थेचे माजी पदाधिकारी किरण खरे यांनी सांगितले आणि त्यांनी आपला मुद्दा सभागृहात सांगितला.
पोलीस ठाण्यात तक्रार
निवडणूक समर्थकांकडून मारहाण झालेल्या पराग शंकर मालप (वय ३२, रा. गुहागर) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात रोहन नवनाथ भोसले, समीर देवकर, प्रकाश मारुती कचरेकर, मिलिंद सुर्वे या चौघांवर भरसभेमध्ये शिवीगाळ करत आणि ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.