बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावणार
By Admin | Updated: July 29, 2015 22:01 IST2015-07-29T22:01:10+5:302015-07-29T22:01:10+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : नियोजित रास्ता रोको स्थगित

बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावणार
रत्नागिरी : कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सकारात्मक दृष्टीकोनातून मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. येत्या १५ दिवसात सहकार खात्याचे प्रधान सचिव कोकणात येऊन लोकप्रतिनिधी व बागायतदारांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतील, अशी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ३ आॅगस्ट रोजी हातखंबा येथे होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे जाहीर करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबा बागायतदार संघातर्फे मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील आमदारही या बैठकीला उपस्थित होते.
सहकार खात्याचे प्रधान सचिव आंबा शेतीच्या संदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची तसेच नवीन विमा योजनासंदर्भातील माहिती देतील, असेही मुख्यमंत्री फडणीस यांनी सांगितले. शिवाय निवेदन वाचून यातील काही मागण्या प्रथमदर्शनी मान्य होण्यासारख्या असल्याचे सांगितले. त्यामध्ये हेक्टरी निकष न लावता प्रतिझाड लावण्याकरिता प्रयत्न केला जाईल.
कर्जाचे त्वरित पुनर्गठण करण्याचे व शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य करण्याचे आदेश देण्यात येतील. यावर्षीचे कर्जावरील व्याज माफ करण्यात आले आहे. पुनर्गठीत कालावधीतकरिता व्याजदर सवलतीबाबत नक्कीच विचार केला जाईल. पीक विम्याचा हप्ता कमीत कमी व सुधारित निकष लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
पुनर्गठणासाठी बाधित शेतकऱ्यांच्या यादीऐवजी बँकेकडून कर्जदारांची यादी मागवून त्यांना पुनर्गठणाचा लाभ देण्यात येईल. नव्याने सर्वेक्षणाबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना याबाबत सांगण्यात येईल, असे सांगितले. परत गेलेली नुकसानभरपाईची रक्कम जिल्ह्याला नव्याने अदा करणेबाबत तसेच ७ टक्के व्याजदराने कर्ज मर्यादा २५ लाखांपर्यत देणे, इत्यादी विषयाकरिता उच्चस्तरीय सचिवांची बैठक येत्या ८ ते १५ दिवसात घेण्यात येईल. त्यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ही बैठक जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर घेण्याचे आदेश यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला जिल्हा संघातर्फे सचिव मंदार सरपोतदार, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, राजेश पेडणेकर, पावस परिसर आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, राजू जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)े